रक्षा विसर्जन न करता यादव कुटूंबियांनी केले वृक्षारोपण

किल्लारी ( ता.औसा ) / प्रशांत नेटके
औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथील यादव कुटुंबियांनी गावात रक्षा विसर्जनाच्या अनोख्या परंपरेला फाटा देत वृक्षारोपण करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. गावातील महेश यादव यांनी त्यांचे बंधू औसा न्यायालयातील प्रसिद्ध वकील भाऊसाहेब व्यंकटराव यादव यांचे रक्षा विसर्जन न करता शेतात वृक्षारोपण केले. महेश यादव यांनी आपल्या बंधूच्या रक्षा विसर्जन पाण्यात न करता शेतात विसर्जित करून त्यावर वृक्षारोपण करत पर्यावरण वाचवण्याचा संदेश दिला . औसा न्यायालयातील लोकप्रिय वकील म्हणून परिचित असलेले भाऊसाहेब यादव यांचे 10 डिसेंबर 2023 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा याकरिता त्यांच्या शेतात 12 डिसेंबर रोजी वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी बालाजी काकडे, महेश यादव ,अर्चना कदम , स्वराली ,संस्कृती, आनंदी ,शंकर यादव , बालाजी पाटील, अक्षय कदम ,यशपाल पाटील, आविष्कार कदम , व आप्तेष्ट मित्रपरिवार उपस्थित होते. जलप्रदूषणाच्या अनुषंगाने अशा समाजपयोगी दिशा देणाऱ्या काम करण्याची गरज निर्माण झाली आहे.त्याला अनुसरून तपसे चिंचोली येथील महेश यादव यांनी जलप्रदूषण रोखण्यासाठी परंपरागत सुरू असलेल्या चालीरीतीना मूठमाती देत हा नवीन संदेश लोकांसमोर ठेवला आहे.