दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – शितलताई पाटील

लोहारा (जि.धाराशिव ) : दिव्यांग व्यक्ती हा समाजातील शेवटच्या स्तरातील व्यक्ती असून, त्याला सामान्य प्रवाहात आणण्यासाठी शासनासोबतच समाजातून मदत मिळण्याची गरज आहे.दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी सास्तूर ग्रामपंचायत येणा-या काळात सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेतील कृत्रिम अवयव वितरण कार्यक्रमात बोलताना सास्तूरच्या सरपंच शितलताई पाटील यांनी केले.
याप्रसंगी उपस्थित दिव्यांगांना संबोधून बोलताना मुख्याध्यापक बालाजी नादरगे म्हणाले की, अलिम्को कडून पुरविण्यात आलेले साहित्य दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडवून आणण्याची क्षमता असलेले साहित्य आहे.त्याचा योग्य वापर करून दिव्यांगांनी स्वावलंबी होण्याकडे वाटचाल करावी.
सास्तूर ता.लोहारा येथील निवासी दिव्यांग शाळेत सास्तूर व परिसरातील दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव व सहाय्यक साधनांच्या वितरण कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राहूल दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सास्तूर ग्रामपंचायत व निवासी दिव्यांग शाळा सास्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. केंद्र शासनाच्या अलिम्को कानपूर या संस्थेकडून माजी मंत्री, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नातून धाराशिव जिल्ह्यातील तसेच लोहारा तालुक्यातील दिव्यांग बांधवांची कृत्रिम अवयव व सहाय्यक साधनांसाठी मोजमाप शिबीराचे मागील वर्षी लोहारा येथे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिरातील पात्र दिव्यांगांची निवड करून, त्यांना दिनांक ६ सप्टेंबर २०२३ रोजी सास्तूर निवासी दिव्यांग शाळेत सास्तूर व परिसरातील ३९ दिव्यांगांना मोटोराईज्ड बाईक, तीन चाकी सायकल, व्हीलचेअर, कुबड्या,काट्या,वाॅकर, सी.पी.चेअर इत्यादी साहित्याचे वितरण समारंभपूर्वक करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सास्तूर ग्रामपंचायतीच्या सरपंच शितलताई पाटील या होत्या, तर प्रमुख पाहूणे म्हणून सास्तूर संरक्षण समिती अध्यक्ष गोविंद यादव, ग्रामपंचायत सदस्य गंगाधर पवार, अशिष वाघमारे, पोलीस पाटील व्यंकटराव चौधरी,निवासी दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक बी.टी.नादरगे,श्री.शांतेश्वर दिव्यांग कौशल्य विकास संस्थेचे प्राचार्य बी.एम.बालवाड, प्रा.बाबुराव ढेले आदींची उपस्थिती होती.तसेच सास्तूर व परिसरातील दिव्यांग नागरिकांची उपस्थिती होती.
अलिम्को कडून उपलब्ध साहित्य दिव्यांगांच्या घरापर्यंत नि:शुल्क पोहचले पाहिजे, दिव्यांग व्यक्तींना आर्थिक झळ सोसावी लागू नये या आ.राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेनुसार भारतीय जनता पार्टी दिव्यांग विभागाचे जिल्हाध्यक्ष समाधान मते, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल गायकवाड, अलिम्कोचे नीरज, बाळू देवकर यांनी साहित्य दिव्यांगांच्या दारापर्यंत पोहचवण्याची व्यवस्था केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल शेळगे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंजली चलवाड,विठ्ठल शेळगे,संध्या गुंजारे, लक्ष्मी मुंडकर, ज्ञानोबा माने, गोरक पालमपल्ले,राम बेंबडे,राजकुमार गुंडूरे,संभाजी गोपे, निवृत्ती सुर्यवंशी, प्रयागताई पवळे, किरण मैंदर्गी,सुनिता कज्जेवाड, भिमराव गिर्दवाड, निशांत सावंत, सुरेखा परीट, सविता बुगे आदींनी परिश्रम घेतले.