धाराशिव: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कळंब तालुक्यातील डिकसळ पाटीजवळ झालेल्या जबरी चोरीप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून लुटीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दिनांक 26 मार्च 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व त्यांच्या पथकाने गुन्हे शोध कार्य सुरू असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कळंब पारधी पिढी येथे जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी वास्तव्यास आहेत. मिळालेल्या माहितीनुसार तातडीने कारवाई करत पोलिसांनी लल्ल्या उर्फ अनिल बादल शिंदे (रा. मोहा पारधी पिढी, कळंब) आणि मिर्च्या उर्फ आकाश रवि काळे (रा. कळंब पारधी पिढी, कळंब) यांना ताब्यात घेतले.
चौकशी दरम्यान आरोपींनी डिकसळ पाटीजवळ एका दाम्पत्याला लुटल्याची कबुली दिली. पोलिस ठाणे कळंब येथे याप्रकरणी गुन्हा क्रमांक 104/2025 नुसार भारतीय दंड संहितेच्या कलम 309(4), 126(2), 3(5) भा.न्या.सं. 2023 अन्वये गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी अधिक तपास केला असता, लुटलेला मुद्देमाल गंगाराम बापू पवार याच्या केज येथे राहणाऱ्या बहिणीच्या मदतीने एका सोनाराला विकल्याची माहिती आरोपींनी दिली. तत्काळ पथक केज येथे रवाना झाले आणि 4.5 ग्रॅम सोन्याचे कर्णफुले, मंगळसूत्र, मणी असा एकूण 27,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान आरोपींनी बीड जिल्ह्यातील युसुफवडगाव येथेही आणखी एका जबरी चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी कळंब पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.