आष्टाकासार ते लोहारा या रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन

संभाजी ब्रिगेडचा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे इशारा
लोहारा (जि.उस्मानाबाद ) : आष्टाकासार ते लोहारा राज्यमार्ग क्रमांक २११ रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. दुरूस्ती नाही झाल्यास शहरात रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
निवेदनात म्हटले की, लोहारा हे तालुक्याचे ठिकाण आहे. तालुक्याला येण्यासाठी या भागातील नागरिकांकडून आष्टाकासार ते लोहारा या मार्गाचा वापर केला जातो. परंतु या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता अशी स्थिती आहे. मागील तीन महिन्यात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात चार ते पाच लोकांचा नाहक बळी गेला आहे. सद्या पावसाचे दिवस असल्याने खड्ड्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यातच तुळजापूर यात्रेमुळे नळदुर्ग मार्गे तुळजापुरला जाणारी वाहने अष्टामोड ते लोहारा मार्गे उस्मानाबादकडे वळविण्यात आली आहेत. वाहनांच्या वर्दळीमुळे या रस्त्याची आणखीनच दुरवस्था झालेली आहे. प्रशासनाने तत्काळ रस्ता दुरुस्ती करून वाहनधारक व नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अन्यथा येत्या १९ ऑक्टोबरला संभाजी ब्रिगेडच्या वतीने लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
निवेदनावर संभाजी ब्रिगेड धाराशिव जिल्हा संघटक धनराज बिराजदार, संभाजी ब्रिगेड लोहारा तालुकाध्यक्ष बालाजी यादव, संभाजी ब्रिगेड कामगार आघाडी लोहारा तालुकाध्यक्ष किरण सोनकांबळे, शहराध्यक्ष पद्माकर चव्हाण, तालुका सचिव खंडू शिंदे, सचिव गोविंद गोरे, तालुका सरचिटणीस अभिजित सूर्यवंशी, तालुका कोषाध्यक्ष शरद जावळे, छगन फुलसुंदर संभाजी, शाखाध्यक्ष स्वप्नील गुंड आदिंच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर आहेत.