भूकंपग्रस्त ५२ गावाच्या विकासासाठी स्वतंत्र पॅकेज द्या ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीची मागणी

लोहारा : उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील भूकंपग्रस्त ५२ गावाच्या विकासासाठी शासनाने स्वतंत्र पॅकेज द्यावे तसेच २४ डिसेंबर २०२२ रोजी कोयना भूकंपग्रस्त लाभार्थ्यांबाबत घेतलेला किल्लारी भूकंपातील लाभार्थ्यांवर अन्याय करणारा शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, ३० सप्टेंबर १९९३ साली उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात महाप्रलयंकारी भूकंप झाला. त्या भूकंपात जवळपास दहा हजार नागरिकांचा मृत्यू झाला. लाखो लोक बेघर झाले. अनेक मुले अनाथ झाली. अशा परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील भूकंपग्रस्त भागाच्या नवनिर्मितीसाठी पुढाकार घेतला गेला. अविरतपणे मदत कार्य चालू केले. या भागात तात्पुरत्या स्वरूपाचे निवाऱ्याची उभारणी करून जलद गतीने कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला गेला व तो पूर्णत्वास नेला. या भागाचे फक्त पुनर्वसन करून चालणार नाही तर या भागातील युवकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी भूकंपग्रस्त प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत वर्ग ३ व ४ मध्ये आरक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय १७ नोव्हेंबर १९९४ रोजी घेण्यात आला. यामुळे या भागातील अनेक लाभार्थ्यांना शासकीय नोकरीचा लाभ झाला. परंतु २४ डिसेंबर २०२२ रोजी शासनाने कोयना भूकंपग्रस्त लाभार्थ्यांबाबत शासन निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १९६७ साली झालेल्या कोयना भूकंपग्रस्तातील लाभार्थ्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला. त्यामुळे जो आदेश १९९४ साली शासनाने किल्लारी परिसरातील भूकंपग्रस्तांसाठी आरक्षण देऊ केले होते. त्याला हरताळ फासण्याचे काम झाले आहे. त्यामुळे उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील मूळ भूकंपग्रस्तावर अन्याय झाला आहे. त्यामुळे हा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा. तसेच किल्लारी परिसरातील भूकंपाला ३० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावेळी राबविण्यात आलेल्या योजना, गावातील रस्ते हे दुरुस्तीसाठी आले आहेत. त्यामुळे उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील भूकंपग्रस्त गावच्या विकासासाठी शासनाने स्वतंत्र पॅकेज घोषित करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे विधानभवनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन केली आहे. यावेळी त्यांना सदरील मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सुरेश बिराजदार, जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, दिग्विजय शिंदे, यांच्यासह भीमा स्वामी, शमशोद्दीन जमादार, प्रवीण यादव, बाळासाहेब स्वामी, बाबा जाफरी, रणजित गायकवाड, खालील पठाण आदी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!