लोहारा तहसिल कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडचे एकदिवशीय उपोषण 

लोहारा : शहरासह संपूर्ण तालुक्याचे अत्यावश्यक असणारे अभिलेख रेकॉर्ड उमरगा तहसील कार्यालयातून ताब्यात घेऊन लोहारा तहसील कार्यालयात कायमस्वरूपी नागरिक व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात यावेत या मागणीसाठी लोहारा तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने शुक्रवारी (दि.१०) लोहारा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. यावेळी लोहारा तहसीलदार संतोष रुईकर यांनी १० दिवसात रेकॉर्ड उपलब्ध करुन घेऊ असे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
लोहारा तालुक्याची निर्मिती होऊन तब्बल २३ वर्षे उलटली अद्यापही सन १९५३ पूर्वीचे जुने खासरा पाहणी पत्रक, फसली १३५७, ७/१२, ८ अ, उतारे, जनगणना, युनिट रजिस्टर यासह आदी अत्यावश्यक असणारी अभिलेख रेकॉर्ड, व कागदपत्रे उमरगा तहसील कार्यालयाच्या अभिलेख कक्षात असल्याने लोहारा शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांना व नागरिकांना जुन्या नकला व कागदपत्रे काढण्यासाठी उमरगा तहसील कार्यालयात गेल्या अनेक वर्षापासून हेलपाटे घालावे लागत आहे.
सतत उमरगा तहसीलमध्ये कागदपत्रे काढण्यासाठी जाऊन ही अभिलेख रेकॉर्ड सापडत नाही, शोध घ्यावा लागेल वेळ लागेल, उद्या या, परवा या, तुमचे रेकॉर्ड लोहारा तहसील कार्यालयात आहे तेथून घ्या असे तेथील कर्मचारी सांगत आहेत. त्यानंतर लोहारा तहसील कार्यालयात रेकॉर्ड मागणीसाठी शेतकरी व नागरिक आले असता सन १९५३ पूर्वीचे संपूर्ण रेकॉर्ड हे उमरगा तहसीलमध्ये उपलब्ध असून तुम्ही तेथून घ्या असे सांगितले जात असल्याने शेतकरी व नागरिकांची मोठी कुचंबना होत असून दोन्ही तालुक्याच्या तहसीलचे उंबरठे झिजवूनही रेकॉर्ड मिळत नसल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
त्यामुळे आपल्या स्तरावरून लोहारा तालुक्याचे अत्यावश्यक असणारे अभिलेख रेकॉर्ड उमरगा तहसील कार्यालयातुन हस्तगत करुन लोहारा तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षात उपलब्ध करुन देऊन शेतकरी व नागरिकांची होणारी गैरसोय दुर करावी, अशी मागणी वारंवार केली होती. परंतु झोपेचे सोंग घेणाऱ्या महसूल विभागाने आश्वासना शिवाय काहीच कार्यवाही न केल्याने शुक्रवारी लोहारा तालुका संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष बालाजी यादव यांच्या नेतृत्वाखाली लोहारा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन सुरू केले होते. अखेर १० दिवसात रेकॉर्ड उपलब्ध करून देण्याबाबत तहसीलदारांनी आश्वासन दिल्याने हे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले आहे.
या आंदोलनात संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष बालाजी यादव, खंडू शिंदे, पद्माकर चव्हाण, स्वप्निल गुंड, अभिजीत सूर्यवंशी, लक्ष्मण पवार, दयानंद चव्हाण, अमोल बिराजदार, यांच्यासह आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!