नवागाव येथील जि.प. शाळेत सीड फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप

नंदुरबार : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवागाव, नंदुरबार येथे ‘शैक्षणिक साहित्य वाटप सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले होते. आय सीड फाउंडेशन, माकणी, उस्मानाबाद यांच्या कडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्य (3 इन 1 वही, 100 पानी वह्या, चित्रकला वही, क्रेयॉन्स खडू, पेन, पट्टी, पेन्सिल,रबर, शॉर्पनर) इत्यादी वाटप करण्यात आले. आय सीडच्या सदर उपक्रमास श्री आदित्य आगारे व मित्रपरिवार यांचे विशेष आर्थिक सहकार्य लाभले आहे, त्याच बरोबर मशाल संस्था, पुणे यांचे विशेष तांत्रिक सहकार्य लाभले आहे.कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बॅग व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षण अधिकारी श्री शेखर धनगर हे होते, यावेळी आय सीड फाउंडेशनचे संचालक श्री. विष्णू शिंदे व ज्यांच्या प्रयत्नातून शाळेस ही भेट मिळाली असे शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री अमोल सोनपेटे यांनी प्रमुख पाहुणे हे पद भूषविले. यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री धनगर साहेब यांनी उपस्थित पालकांना व विद्यार्थ्यांना प्रेरक असे अनमोल मार्गदर्शन केले. आय सीड फाउंडेशनचे संचालक श्री विष्णू शिंदे यांनी सर्व विद्यार्थी पालक यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. “विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यक्तिमत्व विकास होण्यामध्ये पालकांचाही सहभाग शिक्षकांइतकाच महत्वपूर्ण आहे त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष द्यावे” असे आवाहन केले. विद्यार्थ्याचा चेहऱ्यावरील आनंद आणि आत्मविश्वास पाहून ते भारावून गेले होते.
याच वेळी शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री अमोल सोनपेटे यांची नुकतीच सातारा जिल्हा परिषद येथे आंतरजिल्हा बदली झाली त्यामुळे शाळा व उपस्थित व्यासपीठ यांच्या हस्ते त्यांना भेट वस्तू देवून त्यांच्या कार्याचा गौरव करून निरोप समारंभ करण्यात आला. यावेळी श्री सोनपेटे यांनी आपल्या मनोगतात जुन्या आठवणींना उजाळा देत सर्व विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या, यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री अभय सराफ, व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री प्रवीण ठाकरे, सदस्य, पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन श्री अभय सराफ यांनी केले तर आभार सुनील पावरा यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या शिक्षिका श्रीमती विजयालक्ष्मी पाडवी व सोनाली दळवी यांनी परिश्रम घेतले.