लामजना येथील रोहित शिंदेंचे राज्यसेवा परीक्षेत घवघवीत यश

किल्लारी प्रतिनिधी :- सन २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा मंगळवारी ( ता. २८ ) फेब्रुवारी निकाल लागला. त्यामध्ये रोहित संजय शिंदे राहणार लामजना ( ता. औसा ) यांनी ४३ वी रँक घेऊन यश संपादन केले. त्याबद्दल त्यांचा लामजना सह परिसरातील ग्रामस्थातून कौतुक होत आहे. रोहीतचे अभियांत्रिकीचे शिक्षण वालचंद ऑफ इंजनिअरिंग मेकॅनिकल शाखेत सांगली येथे झाले आहे. मुंबई येथे एम. टेकचा पर्याय उपलब्ध असूनही रोहितने स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. घरी राहून अभ्यास करत सन २०२० च्या परीक्षेत त्यांनी ५३ वी रँक मिळवीत यश संपादन केले होते. ते सध्या यवतमाळ येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. आता सन २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत त्यांनी ४३ वी रँक घेत क्लासवन अधिकारी होण्याचा मार्ग सुलभ केला आहे.
याकामी वडील अँड. संजय शिंदे, आई पद्मीनी शिंदे, बहीण डॉ. प्रगती शिंदे आणि प्रशांत शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना लाभले. स्पर्धा परीक्षेसाठी कुठलीही खासगी शिकवणी लावली नव्हती. जिद्दीने अभ्यास करून यश मिळाले असल्याचे वडील अँड संजय शिंदे यांनी सांगितले.