हिंदु-मुस्लिम समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या जिंदावली ऊरूसास आज शनिवारपासून सुरवात

लोहारा,(जि.उस्मानाबाद ) : हिंदु-मुस्लिम समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या तालुक्यातील मार्डी येथील जिंदावली ऊरूसास शनिवारपासून (ता. २५) सुरवात होत आहे. सलग तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने ऊरूस कमिटीकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.
तालुक्यातील मार्डी येथे सुफी संत हजरत ख्वाजा जैनोद्दीन चिस्ती उर्फ जिंदावली यांचा दर्गा आहे. हिंदु-मुस्लिमांचे ते श्रध्दास्थान असून येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात ऊरूस भरतो. या ऊरूसास कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात. २५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान सलग तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता.२५) ऊरूसास प्रारंभ होणार आहे. याच दिवशी लोहारा शहरातून सायंकाळी परंपरेनुसार तहसीलदार संतोष रुईकर यांच्या डोक्यावर मानाचा संदल देऊन सवाद्य मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर हा संदल एका वाहानातून मार्डी येथील जिंदावली दर्ग्याकडे रवाना होईल. त्याननंतर सर्व मानकरी, मान्यवर, ग्रामस्थ, मुजावर यांच्या उपस्थितीत समाधीवर संदल व चादर, फुले वाहून फातिहा पठण केले जाणार आहे. दुसऱ्या दिवशी रविवारी (ता.२६) चिरागाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री नऊ वाजता कव्वालीचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर मानकरी यांच्या उपस्थितीत दर्गाहवर दिवे लावले जातील. तिसऱ्या दिवशी सोमवारी (ता.२७) सकाळी दहा वाजता जियारतचा कार्यक्रम संपन्न होणार असून त्यामध्ये कुराण पठण व फातेहाख्वानी झाल्यानंतर महाप्रसादचे वाटप करण्यात येणार आहे.