धाराशिवराजकीय

संघटन मजबुतीसाठी काँग्रेसचा मोठा निर्णय; लोहाऱ्याला नवे नेतृत्व

लोहारा (जि. धाराशिव) / प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत राज्यभरात पक्ष संघटना अधिक सक्षम व बळकट करण्यासाठी विविध स्तरांवर नियुक्ती प्रक्रिया सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून लोहारा तालुक्यात महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. लोहारा तालुकाध्यक्षपदी दयानंद पाटील तर लोहारा शहराध्यक्षपदी रौफ बागवान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

संघटन सृजन अभियानांतर्गत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नियुक्त निरीक्षकांनी विविध जिल्ह्यांना भेटी देत जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली होती. संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने स्थानिक पातळीवरील सक्रिय कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली होती. यानंतर प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात आलेल्या शिफारशींचा गांभीर्याने विचार करण्यात आला.

तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांवर पक्ष संघटना तळागाळापर्यंत पोहोचविण्याची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

दयानंद पाटील यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सातत्याने काम करत कार्यकर्त्यांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर रौफ बागवान यांनी शहरातील विविध सामाजिक उपक्रमांमधून जनसंपर्क वाढवत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीसाठी पक्षाला मोठी ताकद मिळणार असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या नियुक्तीबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले असून, पक्ष अधिक जोमाने जनतेच्या प्रश्नांवर काम करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!