धाराशिव
ईद ए मिलादुन्नबी : पैगंबरांच्या शिकवणीने उजळला बंधुभावाचा मार्ग

खेड (ता. लोहारा) / प्रतिनिधी
खेड गावात गुरुवारी पहाटेपासूनच वेगळं वातावरण जाणवत होतं. मस्जिदींकडून येणारे नात-शरीफचे सुरेल स्वर, हातात हिरवे झेंडे घेऊन उभे असलेले युवक, छोट्या-छोट्या मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद – हे सर्व काही ईद ए मिलादुन्नबीच्या उत्सवाचे आगमन दर्शवत होते.
इस्लाम धर्माचे प्रेषित, शांततेचे संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त खेडमध्ये मोठ्या थाटामाटात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी प्रथम फातिहा ख्वानी करून पैगंबरांना आदरांजली अर्पण करण्यात आली. वातावरणात एक आगळाच पवित्र भाव पसरला होता.

यानंतर गावातून निघालेला जुलूस हा पाहणाऱ्यांना थक्क करून गेला. धार्मिक घोषवाक्यांच्या गजरात, सजवलेल्या झेंड्यांच्या आणि रंगीबेरंगी पताकांच्या दरम्यान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांचीच पावलं जणू एकाच तालात चालत होती. रस्त्याच्या कडेने उभे असलेले नागरिकही या जुलूसात सामील झाल्यासारखे भासत होते.
जुलूसानंतर सभेत पैगंबरांनी दिलेल्या शांतता, भाईचारा आणि समानतेच्या शिकवणीची आठवण करून देण्यात आली. “धर्म म्हणजे द्वेष नव्हे, तर माणुसकीचा सेतू” — हा संदेश प्रत्येकाच्या मनात ठसत होता.
कार्यक्रमाची सांगता प्रसाद वाटपाने झाली. गोडव्याने भरलेल्या या प्रसादासोबतच प्रत्येक नागरिकांच्या मनात एक गोड भाव उमलला – तो म्हणजे परस्परांतील एकतेचा.




