वनक्षेत्राच्या देखभालीकरिता संयुक्त समिती स्थापन करण्याच्या मागणीसाठी धानुरीचे उपसरपंच विठ्ठल बुरटुकणे यांचे उपोषण सुरु

उस्मानाबाद : लोहारा तालुक्यातील वन विभागाच्या अखत्यारीत असलेल्या संरक्षित जमिनीची देखभाल व विविध प्रकारची विकासकामे व उपाययोजना करण्यासाठी वन विभाग व ग्रामपंचायतची संयुक्त समिती स्थापन करण्यात यावी यासाठी धानुरी (ता. लोहारा) ग्रामपंचायतचे उपसरपंच तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष विठ्ठल बुरटुकणे यांनी उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी (दि.13) उपोषण आंदोलन सुरू केले आहे.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोहारा तालुक्यातील वन विभागाच्या संरक्षित जमिनीची देखभाल, निगराणी व विविध विकासकामे व उपाययोजना कराव्यात यासाठी वारंवार पाठपुरावा करून, निवेदन देऊनही दखल न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला होता. तरीदेखील प्रशासनाने कसलीही दखल घेतली नसल्याने मंगळवारी बुरटुकणे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
21 ग्रामपंचायतीचा आंदोलनास पाठिंबा
लोहारा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीने ठराव पास करून वनक्षेत्राच्या जमिनीचे संवर्धनासाठी निवेदन देण्यात आले. यामध्ये लोहारा तालुक्यातील धानुरी, बेलवाडी, मार्डी, कास्ती (बु.), कास्ती (खु.), मोघा (खुर्द व बुद्रुक), हराळी, कानेगाव, नागराळ या ग्रामपंचायतीनी निवेदन दिले होते. तरीदेखील वन विभागाने या निवेदनाला केराची टोपली दाखवल्यामुळे उपसरपंच बुरटुकणे यांच्या आंदोलनाला तालुक्यातील तब्बल 21 ग्रामपंचायतीनी पाठिंबा दिला आहे.
वन विभागाच्या जागेबाबत अधिकारीच अंधारात !
लोहारा तालुक्यातील नागराळ गावात वनक्षेत्राची जमीन सातबाराच्या उताऱ्यावर असताना माहिती अधिकारात मागविण्यात आलेल्या माहितीत वन विभागाने सदरील गावात वन विभागाची जमीन नसल्याचे लेखी पत्र दिलेले आहे. त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.