शिवलिंगेश्वर फार्मसीचे डॉ. समीर शफी यांची “स्वारातीम” विद्यापिठाच्या अभ्यास मंडळावर बिनविरोध निवड

औसा प्रतिनिधी : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील विविध अभ्यास मंडळाच्या निवडीबाबतची घोषणा दि. 01 डिसेंबर रोजी करण्यात आली. यामध्ये औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमातील अभ्यास मंडळाच्या नियुक्तीचे परिपत्रक विद्यापीठाने जाहीर केले असून फार्मासुटिक्स व फार्मासुटिकल केमिस्ट्री अभ्यासमंडळावर शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी, आलमला येथील फार्मासुटिक्स विभागाचे विभाग प्रमुख डॉ. समीर शफी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नवीन शैक्षणिक धोरण लागू झाल्यापासून त्याची प्रभावी अंमल बजावणी करण्यासाठी अभ्यासमंडळाची भूमिका महत्त्वाची असणार आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन जागतिक स्तरावरची स्पर्धा व विद्यापीठ दर्जा टिकविण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमात सातत्यपूर्ण बदल होणे आवश्यक असतात. म्हणून येत्या काळात नव-नवीन अभ्यासक्रमाची व्याप्ती वाढण्याच्यादृष्टीने तज्ञ मंडळीद्वारे शिफारस केलेलाच अभ्यासक्रम विद्यापीठ राबवत असतात.
या निवडीबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शिवचरण धाराशिवे, उपाध्यक्ष प्रभाकर कापसे, सचिव बसवराज धाराशिवे, सहसचिव महादेव खिचडे, प्राचार्य विश्वेश्वर धाराशिवे, प्रा. दिनेश गुजराथी सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी व लातूर परिसरातील सर्व स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे. सदरील निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना डॉ. समीर शफी यांनी विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व प्राध्यापक, विभाग प्रमुख व महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे विशेष आभार मानले.