लोहारा ( जि. धाराशिव ) : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला असताना उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आजही जनतेच्या मनात आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींमुळे विविध स्तरांवर चर्चांना उधाण आले असून धाराशिव जिल्ह्यातही राजकीय समीकरणांबाबत चर्चा रंगत आहेत. अशा परिस्थितीत आमदार प्रवीण स्वामी यांच्या वक्तव्यामुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाबाबत अधिकृत भूमिका किंवा घोषणा अद्याप समोर आलेली नाही. मात्र राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर आमदार स्वामी यांनी आपली निष्ठा स्पष्ट करत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत कायम राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.