लोहारा : एकोंडी (लो), ता. लोहारा – आज दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालय एकोंडी (लो) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम जनता फाउंडेशन पुणे, श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लातूर आणि ग्रामपंचायत एकोंडी (लो) यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.
कार्यक्रमास पंचायत राज प्रशिक्षण संस्था, मुरुडचे प्राचार्य श्री पांगळसर, श्री राहुल खरात सर, नेत्रतज्ञ श्री संकेत होळकर, श्री शैलेश सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते श्री राम भिकाने, ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री विकास पाटील, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन श्री नरेंद्र पाटील, तंटामुक्त अध्यक्ष श्री जाधव तसेच ग्रामपंचायत अधिकारी श्री महादेव जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य श्री पांगळसर व श्री राहुल खरात यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत असलेल्या नऊ घटकांवर सविस्तर मार्गदर्शन केले. तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरावर मिळणाऱ्या बक्षीस रकमेची माहितीही उपस्थितांना देण्यात आली. तसेच शौचालयाचा वापर, शौचालयांचे प्रकार, परिसर व वैयक्तिक स्वच्छता, हरित गाव, पाणीदार गाव व स्वच्छता अभियान या विषयांवरही मार्गदर्शन करण्यात आले.
नेत्र तपासणी उपक्रमात गावातील एकूण 127 नागरिकांची डोळ्यांची तपासणी करून मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच 17 नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची शिफारस करण्यात आली.
ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून आणि सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत स्वागत केले.