धाराशिव
बाल संस्कार शिबिराचा उत्साहपूर्ण समारोप : महामानवास अभिवादनाने कार्यक्रमाची सांगता

लोहारा (प्रतिनिधी) : दिनांक 06 एप्रिल ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत रामनवमी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दरम्यान भारतमाता मंदिर, लोहारा येथे रा.स्व.संघ व जनकल्याण समिती संचलित भारतमाता मंदिर प्रकल्प यांच्या वतीने वय वर्षे 5 ते 14 या वयोगटातील बालकांसाठी बाल संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप महामानवांच्या स्मरणाने व अभिवादनाने करण्यात आला.
या दहा दिवसांच्या शिबिरात बालकांना प्राणायाम, योगासन, सूर्यनमस्कार, मैदानी खेळ, श्लोक, मंत्र, देशभक्तीपर गीत आदींचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच जल दिन, वन दिन, मृदा दिन, चिमणी दिवस अशा निसर्गाशी संबंधित दिनांवर आधारित माहिती सत्र, तसेच विविध जातींच्या सापांविषयी जागरूकता कार्यक्रम राबविण्यात आले. याशिवाय, श्रीराम नवमी, भगवान महावीर जयंती, हनुमान जयंती, महात्मा फुले जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या महान व्यक्तींच्या जीवनकार्यावर आधारित व्याख्यानेही घेण्यात आली.
बालकांसाठी हस्ताक्षर, चित्रकला, भाषण, कागदाकाम अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
शिबिराचे उद्घाटन लोहारा नगर पंचायतच्या नगराध्यक्षा सौ. वैशालीताई खराडे यांच्या हस्ते तर समारोप सकाळचे पत्रकार नीळकंठ कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
या शिबिराचे मार्गदर्शन प्रकल्प कार्यवाह रवींद्रजी पूर्णपात्रे व शंकर जाधव (पूर्णवेळ कार्यकर्ते) यांनी केले. यासोबतच शहाजी जाधव, दयानंद क्षीरसागर, श्रीनिवास माळी, वीरेश स्वामी, यशवंत चंदनशिवे, डॉ. रूपाली श्रीगीरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
शिबिरामध्ये सहभागी विद्यार्थ्यांसाठी खाऊचे आयोजन नगरसेवक अविनाश माळी, वैजिनाथ जट्टे, अष्टविनायक गणेश मंडळ, अमित बोराळे, दत्तात्रय सलगरे मामा, राम वैरागकर, ज्ञानेश्वर लोखंडे, दत्तात्रय दंडगुले, गणेश खबोले यांच्याकडून करण्यात आले.
या उपक्रमामुळे बालकांमध्ये नैतिक मूल्यांची जाणीव, देशभक्ती, सामाजिक जाण व सर्जनशीलता विकसित झाली असून, हे शिबिर यशस्वी ठरल्याबद्दल सर्व स्तरातून आयोजकांचे कौतुक होत आहे.



