भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन उत्साहात साजरा

लोहारा : आज १४ जानेवारी रोजी लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी समाजकल्याण सभापती श्री. हरीशजी डावरे, जिल्हा रोजगार आघाडीचे अध्यक्ष श्री. उत्तम भालेराव, रोजगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. संजय नाना शितोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कोषाध्यक्ष श्री. जगदीश पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या माजी तालुकाध्यक्ष श्रीमती रंजनाताई हासुरे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री. अभिजित भैय्या लोभे, श्री. बाबा शेख, श्री. गिरीश भगत यांच्या सह अनेक मान्यवर व पत्रकार यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमापूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत भारताचे संविधान व आक्रोश चेतनेचा ही दोन पुस्तके भेट देऊन करण्यात आले. नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. दौलतराव घोलकर यांनी केले. श्री. संजय नाना शितोळे यांनी आपल्या भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार सार्थक होण्यासाठी सामाजिक समता प्रस्थापित होणे आवश्यक असल्याचे मत मांडले. श्रीमती रंजना हासूरे यांनी विद्यापीठाचा नामविस्तार होण्यासाठी झालेल्या संघर्षावर प्रकाश टाकून पुरोगामी विचारांची समाजाला असणारी आवश्यकता व महत्व आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पटवून दिले. श्री. जगदीश पाटील यांनी आपल्या भाषणात जातीयता संपवण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज असल्याचे सांगून गोवोगावी संविधान ग्रंथाचा सप्ताह झाल्यास देशाची एकात्मता व प्रगती होण्यास वेळ लागणार नाही असे आग्रही प्रतिपादन केले. श्री. हरीशजी डावरे यांनी संविधानाचे महत्व पटवून देऊन सामाजिक व राजकीय स्थितीवर विचार मांडून संविधानाचे रक्षण करणे सद्यकाळाची गरज असल्याचे ठाम सांगितले. नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून आले होते. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थीनींनी आंबेडकरी जलसा व भिमगीत यांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमप्रसंगी प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होते.