धाराशिव
स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा मेळाव्यात सास्तूर निवासी दिव्यांग शाळेची सर्वोत्कृष्ट कामगिरी

———————————
समूहनृत्य व प्रश्नमंजुषा स्पर्धेत पटकावले प्रथम पारितोषिक, तर तंबू सजावट व शारीरिक प्रात्यक्षिक स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवत दिव्यांग विद्यार्थ्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी
———————————
धाराशिव : धाराशिव भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालय, शिक्षण विभाग जिल्हा परिषद,धाराशिव व विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूल, येरमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ६ फेब्रुवारी,२०२५ ते ८फेब्रुवारी,२०२५ या कालावधीत विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूल, येरमाळा येथे कब – बुलबुल, स्काऊट – गाईड जिल्हा मेळावा सन २०२४ – २०२५ चे भव्य आयोजन करण्यात आले होते.
लोहारा तालुक्यातील सास्तूर निवासी दिव्यांग शाळेतील ६ कब – बुलबुल, तर १९ स्काऊट – गाईड असे एकूण २५ दिव्यांग विद्यार्थी सहभागी झाले होते. या दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण, शिस्त, सहकार्य आणि सामाजिक जबादारीची भावना वृद्धिंगत व्हावी यासाठी ही दिव्यांग मुले जिल्हा मेळाव्यात सहभागी झाली होती.
सदर जिल्हा मेळाव्यात ८ तालुक्यातून १००० पेक्षा जास्त कब – बुलबुल, स्काऊटस् – गाईडस् सहभागी झाले होते. मेळाव्यात आयोजित सर्व उपक्रम तसेच विविध स्पर्धेत सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत दिव्यांग विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. लोकनृत्य स्पर्धेत प्रशालेच्या संघाने बहारदार नृत्य सादर करीत सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धतील प्रथम पारितोषिक जिंकले. प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रशालेतील भाग्येश गुंडू इस्लामपूरे, संध्याराणी बिभीषण कदम, रितेश गणेश देशमुख या विद्यार्थ्यांनी लोहारा तालुक्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवून दिले. तसेच शाळेच्या संघाने तंबू सजावट व शारीरिक प्रात्यक्षिक स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.
मेळाव्यात आयोजित बीन भांड्यांचा स्वयंपाक, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनविणे, समुहगीत गायन या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. शेकोटी कार्यक्रमात बालविवाह प्रतिबंध जनजागृतीपर लघुनाटिका तसेच विविध कलागुण सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
शाळेच्या यशस्वी संघाला उमरगा- लोहारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी सर, विक्रांत देशपांडे जिल्हा संघटक (स्काऊट), श्रीमती उषा सर्जे जिल्हा सह चिटणीस स्काऊट आणि गाईड धाराशिव, विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सचिन पाटील, ट्रेनिंग काऊन्सिलर तथा मेळावा प्रमुख रमेश माने,जिल्हा प्रशिक्षण आयुक्त (गाईड) सविता पांढरे, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त (स्काऊट) दिपक पोतदार,सुरेश वाघमोडे आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
सदर जिल्हा मेळाव्यात प्रशालेतील कु.पूजा कुकुर्डे, सौंदर्या कुकुर्डे कु. संध्याराणी कदम, कु. ममता गोटमुखले, अस्मिता वाघमारे,गीतश्री निळे, श्रावणी अरलवाड,अदिती गायकवाड, सरस्वती पुजारी,अनुष्का वाघमोडे,स्वराली शिंदे, रितेश देशमुख,भाग्येश इस्लामपूरे,प्रशांत कांबळे, करण माने,रुद्र जगताप, सोमनाथ भालेकर,प्रणव माने,प्रणव अडसूळ, हुसेन मुजावर,सोमनाथ सुरवसे,करण शिंदे, विठ्ठल राजूरे, निवृत्ती दहिफळे, भागवत शिंदे या दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.