महाराष्ट्र

स्पर्श ग्रामिण रुग्णालयला “मराठवाडा रत्न” पुरस्कार

लोहारा / उमरगा (जि.धाराशिव ) : आरोग्य सेवेत दर्जेदार आरोग्य सेवेची अनेक शिखरे पादाक्रांत करणाऱ्या ग्रामीण रुग्णालय स्पर्श सास्तुरला मराठवाडा सेवक प्रतिष्ठान पुणे तर्फे मराठवाडा मुक्ती दिन स्मृती निमित्त दिला जाणारा “मराठवाडा रत्न” हा आरोग्य सेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल दिला जाणारा या वर्षीचा पुरस्कार ग्रामीण रुग्णालय स्पर्श सास्तुरला देण्यात आला.

   यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड पुणे येथे दि.८ ऑक्टोबर रोजी दिमाखदार सोहळ्यात प्राईड इंडीया ग्रामीण रुग्णालय स्पर्श सास्तुरचे प्रकल्प अधिकारी श्री. रमाकांत जोशी व रुग्णालयातील कर्मचार्यांनी तो पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्विकारला.
मराठवाडा सेवक प्रतिष्ठान पुणे तर्फे मराठवाडा मुक्ती दिनाच्या स्मृती निमित्त दर वर्षी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना/ संस्थाना हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. शिक्षक रत्न, उद्योग रत्न, आदर्श पत्रकारिता, आरोग्य रत्न, साहित्य रत्न, शिक्षण रत्न, संगीत रत्न कला रत्न इ. पुरस्कार देण्यात येतात.
मा.श्री. पद्मश्री भिकुजी (दादा) इदाते मा. अध्यक्ष केंद्रीय विमुक्त भटक्या व अर्धाभटक्या जमाती विकास मंडळ नवी दिली यांच्या शुभहस्ते तसेच श्री. गो.ब.देगलूरकर मा. कुलसचिव डेक्कन अभिमत महाविद्यालय, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. भाऊसाहेब जाधव, कार्याध्यक्ष मराठवाडा मित्र मंडळ, पुणे हे उपस्थितीत होते.
याच कार्यक्रमात श्री. गो.ब.देगलूरकर मा. कुल सचिव यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘मराठवाडा आरोग्य रत्न’ हा मनाचा आरोग्य सेवेतील उल्लेखनीय कामगिरी बद्दल दिला जाणारा पुरस्कार स्वीकारताना विशेष आनंद होत असल्याचे प्रतिपादन श्री.रमाकांत जोशी प्रकल्प अधिकारी ग्रामीण रुग्णालय स्पर्श सास्तूर यांनी केले.
ते आपल्या भाषणात म्हणाले कि, किल्लारी सास्तूरच्या प्रलयंकारी भूकंपानंतर येथील तातडीच्या आरोग्य सेवेची गरज ओळखून ३० खाटांच्या इवल्याश्या रोपट्याचे रुग्णालयाचे वृटवृक्षात रुपांतर झाले आहे. या वटवृक्षाची एक एक फांदी, पारंबी म्हणजे स्पर्शचे आरोग्य सेवेतील अनेक दर्जेदार उपक्रम आहेत नाविन्य पूर्ण उपक्रम आहेत यात सास्तुरचा दुष्काळग्रस्त भाग असल्यामुळे शास्त्रोक्त पद्धतीने पावसाच्या पाण्याचे बोअर पुनर्भरण ज्या व्दारे कडाक्याच्या दुष्काळात देखील बोअरवेल व्दारे पाणी उपलब्ध होते. वैद्यकीय प्रक्रीयेव्दारे सांडपाण्याचा पुनर्वापर. कर्मचारी व रुग्णाचे यांच्या सहकार्याने श्रमदानातून सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादन जो ताजा भाजीपाला रुग्णालयात कॅन्टीनमध्ये रुग्णांचे भोजन तयार करण्यासाठी वापरला जातो विविध आयुर्वेदिक गुणधर्म असलेल्या औषधी वनस्पतीचे आयुष उद्यान, गांडूळखत निर्मिती प्रकल्प, ३ फिरत्या आरोग्य पथकांमार्फत परिसरातील दुर्गम गावात ज्या ठीकाणी शासकीय आरोग्य यंत्रणा उपलब्ध नाही अशा १२४ गावात या पथकामार्फत आरोग्य सेवा पुरवली जाते. तसेच एच.आय.व्ही.संसर्गित व्यक्तींना मानसिक आधार व सकस आहार मोफत पुरवणे इ. उल्लेखनीय नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. बाह्यरुग विभागात २७ वर्षात जवळपास १.५ कोटीच्या वर रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला. ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय असून वर्षाला ८० हजाराच्यावर रुग्ण बाह्यरुग्ण विभागात दर्जेदार आरोग्य सेवेचा लाभ घेतात. Bed Occupancy Ratio सातत्यपूर्ण १२५ टक्केच्यावर असून दर वर्षाला १५०० ते १६०० नॉर्मल बाळंतपणे, ६०० ते ७०० सिझेरियन शस्त्रक्रिया, १२०० ते १३०० मोठ्या व छोट्या शस्त्रक्रिया दर वर्षाला होतात.

स्वच्छतेला कमालीचे महत्व दिल्या जात असलेल्या स्पर्श मध्ये दर शनिवारी स्वच्छतेची शपथ घेऊन कर्मचारी डॉक्टर्स व रुग्णांचे नातेवाईक श्रमदानातून रुग्णालयाच्या संपूर्ण परिसराची स्वच्छता करतात.
ग्रामीण रुग्णालय स्पर्शमध्ये बाह्य रुग्ण विभाग, अंतरुग्न विभाग, प्रसूतीगृह, अद्यावत मॉडूलर शस्त्रक्रिया गृह, अद्यावत उपकरण उक्त सुसज्ज प्रयोगशाळा, क्ष-किरण विभाग, औषधी विभाग, ईसीजी विभाग, सोनोग्राफी विभाग, लसीकरण विभाग, प्रसूती मतांसाठी स्वतंत्र कक्ष, नवजात अर्भकांसाठी एन.बी.एस.यु., किचन गार्डन, सर्वासाठी आर.ओ.मिनिरल वॉटर पाणी पुरवठा चहा, कॉफी, सूप मशीन, रुग्णासाठी वाचनालय, दूरदर्शन, रक्त साठवण केंद्र, रुग्णांना ने आन करण्यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका सर्व प्रकारच्या तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता इ. सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या ग्रामीण रुग्णालय स्पर्शला अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य स्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. परंतु ज्या मातीत आपण काम करतो ज्या मातीचे ऋण फेडताना आपल्या माणसांनी कार्याचे कौतुक करण्यासाठी दिलेला हा “मराठवाडा रत्न” पुरस्कार विशेष हुरूप, उभारी देऊन जातो त्या बद्दल मराठवाडा सेवक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. दिनकर चौधरी, कार्याध्यक्ष श्री. दिनेश सास्तूरकर, सचिव श्री. गणेश चौधरी यांचे विशेष आभार मानले मराठवाडयात आजही अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत ज्यात शेतकरी आत्महत्या प्रचंड होत असलेले स्थलांतर, व्यसनाधिनता, बेरोजगारी इ. मध्ये सर्वांनी लक्ष घालून या समस्या दूर करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी शेवटी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!