पालकांनी सुद्धा दक्ष असणे गरजेचे – ग्रीन लँडच्या मुख्याध्यापिका उल्का पाटील

जेवळी (ता.लोहारा,जि.धाराशिव ) :- स्पर्धेच्या युगात शहरी भागातील विद्यार्थ्यांना विविध सोयी सुविधा असतात आणि त्या सहज उपलब्ध होतात त्या मानाने ग्रामीण भागातील विद्यार्थी पाठीमागे राहत असून त्या संदर्भात उपाययोजना आणि पालकांनी सुद्धा दक्ष असणे गरजेचे असल्याचे मत ग्रीन लँडच्या मुख्याध्यापिका उल्का पाटील यांनी केले.
लोहारा तालुक्यातील विलासपूर पांढरी या गावातील शालेय विद्यार्थ्यांसाठी श्रीमती कोंडाबाई पाटील व कै. गणपतराव पाटील यांच्या स्मरणार्थ वर्षभरात शालेय विद्यार्थ्यांनी केलेल्या उज्ज्वल कामगिरी बद्दल पारितोषिक आणि चषक देवून गौरविण्यात आले. या पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मारूती कार्ले तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य आर.टी. राठोड, ग्रीन लँडच्या मुख्याध्यापिका उल्का पाटील, अँँड मुरगे, प्रा व्यंकटराव चिकटे,उपसरपंच अशोक जांभळे, पर्यवेक्षक एम. वाय. भोसले, डॉ. आदिती लोंखडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जवाहर विद्यालय अणदूर येथील सेवानिवृत्त झालेले प्राचार्य व्यंकटराव पाटील यांनी जन्म भूमी असलेल्या विलासपूर पांढरी या आपल्या गावातील शालेय विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे राहू नये म्हणून विविध स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न सुरू केले होते. सेवानिवृत्त प्राचार्य व्यंकटराव पाटील यांचे अल्पशा आजाराने दोन महिन्यापूर्वी निधन झाले परंतु गावातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली परंपरा पाटील परिवाराच्या वतीने पुन्हा चालू ठेवत 15 आँगस्ट या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून इयत्ता चौथी ते बारावी वर्गातील विद्यार्थ्यांना व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याचा रोख बक्षिसे व सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना ग्रीन लँडच्या मुख्याध्यापिका उल्का पाटील या कै.व्यंकटराव पाटील म्हणजे बाबा यांच्या आठवणीने गहिवरून गेले होते बाबांनी सुरू केलेली परंपरा आम्ही भावडं, काका आणि पाटील कुटुंब पुढे असेच चालू ठेवण्याचे आश्वासन दिले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की ग्रामीण भागात विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध प्रकारच्या माध्यमातून स्पर्धा घेणे,वाचनाची आवड निर्माण करणे,व्याखानाचे आयोजन करणे असे उपक्रम राबविले पाहिजे यासाठी पालकांचा पुढाकार खूप महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास पोलीस पाटील सूर्यकांत पाटील, गजानन जायफळे, उन्मेष पाटील, किसन खोत,सिद्धेश्वर कार्ले, महादेव कार्ले,गहिनीनाथ बिराजदार, किसन जांभळे यांच्यासह गावातील नागरिक, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित कार्ले यांनी तर आभार धनराज कार्ले यांनी केले.
प्रा व्यंकटराव चिकटे यांनी सेवानिवृत्त प्राचार्य कै.व्यंकटराव पाटील यांची कामाची पद्धत, उच्च विचारक्षेणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चालना मिळावी आणि विद्यार्थी स्पर्धेत टिकून राहिला पाहिजे म्हणून त्यांनी सुरू केलेला उपक्रम नाविन्यपूर्ण होता यातूनच त्याची गावावरती असलेले प्रेम आणि दूरदृष्टी दिसून येते. विलासपूर पांढरी या गावातील जागृत भवानी मातेचे मंदिर आहे त्यामुळे या परिसरात भवानी मातेचे गाव म्हणून गावची ओळख आहे त्याच बरोबर विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकून राहून चांगले अधिकारी होवून या गावची ओळख अधिकार्यांचं गाव अशी करावी असे आवाहन केले.