लोहारा ( जि. धाराशिव ) : लोहारा तालुक्यातील कानेगाव जिल्हा परिषद मतदारसंघात शेतकरी नेते अनिल जगताप यांच्या पत्नींच्या अपक्ष उमेदवारीने राजकीय वातावरण तापले आहे. आज आरणी येथे अनिल जगताप यांनी शेतकरी बांधवांची भेट घेतली. यावेळी शेतकरी बांधवांनी “कुठल्याही परिस्थितीत अपक्ष उमेदवारीचा फॉर्म काढून घेऊ नका” असा ठाम आदेश दिला.
पक्षीय राजकारणामुळे शेतकरी प्रश्न बाजूला पडत असल्याची भावना व्यक्त करत, अपक्ष उमेदवारीच शेतकरी हिताचा खरा आवाज ठरेल, असा विश्वास शेतकरी बांधवांनी व्यक्त केला. स्वच्छ प्रतिमा, थेट जनसंपर्क आणि शेतकरी प्रश्नांवरील ठोस भूमिका यामुळेच ही उमेदवारी कायम ठेवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शेतकरी बांधवांच्या भूमिकेला दुजोरा देताना अनिल जगताप म्हणाले, “शेतकरी बांधवांचा आदेश आमच्यासाठी अंतिम आहे. त्यांच्या विश्वासाचे पालन होणारच. पत्नीची अपक्ष उमेदवारी कोणत्याही परिस्थितीत मागे घेतली जाणार नाही.”
या ठाम भूमिकेमुळे कानेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली असून, अपक्ष उमेदवारीमुळे प्रस्थापित पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र आहे.