लोहारा ( जि. धाराशिव ) : लोहारा तालुक्यातील सास्तूर जिल्हा परिषद गटातून अंजली गणेश सरवदे यांनी उमेदवारी जाहीर केल्याने स्थानिक राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
त्या सास्तूरच्या माजी सरपंच छाया गणेश सरवदे यांच्या कन्या असून, तसेच परिसरातील ज्येष्ठ नेते अशोकराजे सरवदे यांच्या त्या पुतणी आहेत. त्यामुळे सामाजिक, राजकीय व विकासकामांची परंपरा त्यांना कुटुंबातूनच लाभली आहे.
अंजली सरवदे या तरुण, सुशिक्षित आणि सामाजिक जाणीव असलेल्या उमेदवार म्हणून ओळखल्या जातात. महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते विकास तसेच शेतकरी हिताच्या प्रश्नांवर त्यांचा ठाम भर आहे. माजी सरपंच छाया सरवदे यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांचा अनुभव आणि जनतेशी असलेला थेट संवाद हे त्यांच्या उमेदवारीचे प्रमुख बळ मानले जात आहे.
सास्तूर परिसरात त्यांच्या उमेदवारीला महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, “नव्या पिढीचे नेतृत्व” म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. विकासकामात पारदर्शकता, लोकसहभाग आणि प्रामाणिक अंमलबजावणी या मुद्द्यांवर भर देत सास्तूर गटाचा सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, सास्तूर जिल्हा परिषद गटात अंजली सरवदे यांची उमेदवारी निवडणूक रंगत वाढवणारी ठरत असून, आगामी निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.