विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्या संभाजी ब्रिगेडची मागणी

लोहारा (उस्मानाबाद ) :राज्यातील ० ते २० विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी असून सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर ठेवण्याच षडयंत्र राज्य सरकारीत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संघटक धनराज बिराजदार यांनी केला आहे. दरम्यान, पटसंख्या कमी असल्याचे कारण देऊन बंद करण्यात येत असलेली कार्यवाही त्वरित थांबविण्यात यावी, असे निवेदन लोहारा तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे गुरुवारी १३ ऑक्टोबर रोजी पाठविले आहे.
निवेदनात म्हटले की, महात्मा जोतिबा फुले यांनी हंटर कमिशन मांडले होते. छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी त्याची अंमलबजावणी केली. त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून मांडले असून आरटीई अॅक्ट २००९ नुसार बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्काची तरतूद आहे. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणात वस्ती तेथे शाळा हे धोरण शासनाने अवलंबले आहे. त्यानुसार वस्ती, पाडे, तांडे, वाड्या अशा दुर्गम भागात शाळा सुरु करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे निश्चितच शाळाबाह्य विद्यार्थी प्रमाण कमी झाले आहे. कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांचे प्रमाण अतिशय दुर्गम तसेच वाडी,वस्ती, तांडे व आदिवासी बहुल भागात अधिक आहे.
शाळा बंद झाल्यास तेथील मुलांच्या व विशेषत: मुलींच्या शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम होऊन ते कायमचे शिक्षण प्रवाहापासून दूर लोटले जातील, करण काही आदिवासी भागात पक्के रस्ते नाहीत. गाव, वस्तीच्या बाजूला नद्या, नाले असल्यामुळे पावसाळ्यात या भागाचा अनेक दिवस संपर्क तुटतो. कुठलेही दळणवळणाची साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे या बाबीचा गांभिर्याने विचार करावा. विद्यार्थीसंख्येअभावी कोणतीही शाळा बंद करण्यात येऊ नये. तसेच, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी शिक्षकभरती करावी, शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे काढून टाकावीत, पुरेशा भौतिक सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात. यासारख्या उपाययोजना करण्याची मागणी निवेदनात केली आहे.
निवेदनावर संभाजी ब्रिगेड उस्मानाबाद जिल्हा संघटक धनराज बिराजदार, लोहारा तालुकाध्यक्ष बालाजी यादव, कामगार आघाडी अध्यक्ष किरण सोनकांबळे, लोहारा शहराध्यक्ष पद्माकर चव्हाण, तालुका सचिव खंडू शिंदे, गोविंद गोरे, तालुका सरचिटणीस अभिजित सूर्यवंशी, तालुका कोषाध्यक्ष शरद जावळे, छगन फुलसुंदर, शाखाध्यक्ष स्वप्नील गुंड, जेवळी शाखाध्यक्ष ओमकार चव्हाण, राहुल सुरवसे, गणेश सुरवसे, प्रितम जावळे, भैरवनाथ चव्हाण आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.