जगदंबा देवीच्या मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व शिखर कळसारोहन

जेवळी ( ता.लोहारा ) : विलासपूर पांढरी (ता. लोहारा) येथे जवळपास पन्नास लाख रुपये खर्चून जिर्णोद्धारा केलेल्या जगदंबा देवीच्या मंदिरात गुरुवारी (ता.२१) मठाधीश श्री.म.नि.प्र. गुरु गंगाधर महास्वामीजी व पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अध्यक्ष श्री ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व शिखर कळसारोहन कार्यक्रम पार पडला. यानिमित्त येथे गेल्या तीन दिवसापासून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असून या प्रसंगी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विलासपुर पांढरी येथे जगदंबा देवीचे पुरातन मंदिर आहे. ही देवी या परिसरात अनेकांचेची कुलदैवत असून प्रतिवर्षी येथे विजयादशमीला मोठी यात्रा भरते. मंदिर समितीकडून मंदीरा पुढील भूकंपानंतर उध्वस्त झालेले पूर्ण गाव साफ करून सुशोभित करण्यात आले आहे. या मंदिर परीसरात आमदार निधी, तीर्थक्षेत्र विकास व शासनाच्या विविध योजनेतून विविध विकास कामे झाले आहेत. आता आधुनिक पद्धतीने मंदिर बांधण्यासाठी मंदिर समितीने गेल्या दोन वर्षापासून जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले आहे. आता मठाधीश श्री.म.नि.प्र. गुरु गंगाधर महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास पन्नास लक्ष रुपये खर्चून दक्षिणात्य शैलीने मंदिराचे बांधकाम पूर्ण केले आहे. ही निधी परिसरातील भाविक भक्ताकडून संकलन करण्यात आले आहे. मंदिर जीर्णोद्धारासाठी येथील युवकांनी विशेष पुढाकार घेतला आहे. गुरुवारी (ता.२१) ब्राह्मी मुहूर्तावर वेद मूर्ती बसवराज शास्त्री यांच्या धार्मिक विधीना सुरुवात झाली. सकाळी नऊच्या सुमारास मठाधीश श्री. मनिप्र गुरु गंगाधर महास्वामीजी व पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अध्यक्ष श्री हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व शिखर कळसारोहन कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, लातूरचे माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, सरपंच मारुती कार्ले. मंदिर समितीचे अध्यक्ष व्यंकट पाटील, सचिव पंडित कार्ले यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान यानिमित्त येथे गेल्या चार दिवसापासून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. मंगळवारी (ता.१९) श्री हभप महेश महाराज माकणीकर यांचे किर्तन सेवा, बुधवारी (ता.२०) सकाळी पारंपारिक वाद्य, कलश कुंभ व भजनी मंडळ सहित गावातून देवी मंदिरापर्यंत शोभायात्रा, रात्री श्री हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे किर्तन पार पडला.