विद्यामाता इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केली 15 पदकांची कमाई

लोहारा प्रतिनिधी :-
लोहारा तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी केली 15 पदकांची कमाई केली. तुळजापूर येथे दहावी राज्यस्तरीय तेंग सु डो अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यातील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थी आणि क्रीडा प्रशिक्षकासह आयोजकांच्या उपस्थितीत आई अंबाबाई ची महाआरती करण्यात आली. महाद्वारातून मशाल पेटवून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यत विद्यार्थ्यांनी जयघोष करत मार्च काढला. याप्रसंगी स्पर्धेच्या मुख्य आयोजक शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख शामल वडणे पवार, तेंग सु डो स्पोर्टस् फेडरेशन ऑफ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मास्टर रॉकी डिसुझा, महासचिव मास्टर सुभाष मोहिते, जिल्हाध्यक्ष मास्टर महमदरफी शेख, धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर, माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
या स्पर्धेमध्ये विद्यामाता शाळेतील पंधरा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये पाच विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावले, पाच विद्यार्थ्यांनी रोप्य पदक आणि पाच विद्यार्थ्यांनी कास्यपदक पटकावले. एकूण 15 पदकांची कमाई विद्यामाता शाळेने केली. शाळेतील क्रीडा शिक्षक कुसळकर यांचे या स्पर्धेसाठी सहकार्य लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाचे नियोजन करण्यात आले होते. संपूर्ण राज्यभर विद्यामाता शाळेचे नाव लौकिक झाले. उपस्थित मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. संस्थेच्या वतीने शाळेच्या मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे कौतुक केले.