धाराशिवराजकीय

बळीराजाच्या प्रश्नांसाठी थेट संवाद! शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सुप्रिया शेतकरी संवाद दौऱ्याची’ कानेगाव मतदारसंघात दमदार सुरुवात

लोहारा जि. धाराशिव (प्रतिनिधी):
पद्मविभूषण, देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १२ डिसेंबर रोजी कानेगाव जिल्हा परिषद मतदारसंघात ‘सुप्रिया शेतकरी संवाद दौऱ्याची’ प्रभावी सुरुवात करण्यात आली. शेतकऱ्यांच्या वेदना, अडचणी आणि हक्क थेट समजून घेण्यासाठी राबविण्यात येणारा हा दौरा भातागळी (ता. लोहारा) येथून प्रारंभ झाला असून या उपक्रमाने संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले आहे.

या संवाद दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे कोणताही राजकीय दिखावा न करता थेट शेतकरी बांधवांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शरद पवार साहेबांवर अपार श्रद्धा असलेल्या पाच शेतकरी बांधवांच्या हस्ते उद्घाटन करून बळीराजालाच केंद्रस्थानी ठेवण्याची नवी परंपरा निर्माण करण्यात आली. त्यामुळे तालुक्यात या उपक्रमाची चर्चा सुरू असून “शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या हातून” हा संदेश प्रभावीपणे पोहोचला आहे.

प्रलंबित अनुदानांसाठी ठोस पाठपुरावा
‘सुप्रिया शेतकरी संवाद दौऱ्या’च्या माध्यमातून सन २०२० ते २०२५ या कालावधीतील पिक विमा, अतिवृष्टी अनुदान, कांदा अनुदान, प्रोत्साहन अनुदान, दूध अनुदान तसेच शासनाच्या विविध योजनांमधील रखडलेली देणी व अडचणी याबाबत शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेतले जात आहेत. हे सर्व प्रश्न शासन दरबारी मांडून त्याची सोडवणूक होईपर्यंत पाठपुरावा केला जाईल, असा ठाम विश्वास शेतकरी नेते अनिल जगताप यांनी व्यक्त केला.

गावागावात पोहोचणार संवाद
हा संवाद दौरा कानेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील आरणी, कानेगाव, भातागळी, काष्टी खुर्द, काष्टी बुद्रुक, नागूर, लोहारा खुर्द, मोगा खुर्द, मोगा बुद्रुक, शिवकरवाडी, बेलवाडी, नागराळ, बेंडकाळ, उंडरगाव, मार्डी, हिप्परगा रवा आदी गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला थेट आपली व्यथा मांडण्याची संधी मिळणार आहे.

भातागळी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद
भातागळी गावात श्री बालाजी आनंदगावकर, श्री चंद्रकांत पवार, श्री लक्ष्मण चव्हाण, श्री हनुमंतदादा जगताप, श्री दत्तात्रय मिसाळ तसेच सरपंच श्री हनुमंत भानुदास जगताप यांच्या हस्ते या दौऱ्याचे उद्घाटन करण्यात आले. राजकीय नेत्यांऐवजी शेतकऱ्यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटनामुळे कार्यक्रमाला वेगळीच उंची मिळाली असून शेतकरी वर्गात समाधानाची भावना दिसून येत आहे.

शेतकरी चळवळीचा ठसा
हा उपक्रम शेतकरी नेते अनिल जगताप यांच्या संकल्पनेतून साकार झाला असून भातागळी येथील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश जगताप, शुभम जगताप, अभिषेक जगताप, गणेश फत्तेपुरे, वैभव जगताप, गोविंद जगताप, संकेत जगताप, मुकुंद चव्हाण, महादेव आनंदगावकर, दयानंद मिसाळ, दादा चव्हाण आदी शेतकऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.

जानेवारीत जाहीर सभेने समारोप
पुढील आठवड्यात मतदारसंघातील प्रत्येक गावात ‘सुप्रिया शेतकरी संवाद दौरा’ पार पडणार असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लोहारा येथे जाहीर सभेने या दौऱ्याचा समारोप होणार आहे. या सभेसाठी संसदरत्न सुप्रिया सुळे व खासदार अमोल कोल्हे यांना आमंत्रित करण्याचा मानस असल्याची माहिती संयोजक अनिल जगताप यांनी दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!