मीडियाचा व्हॉइस बुलंद व्हावा – डॉ.ओमप्रकाश सदाशिव शेटे

मीडिया अर्थातच माध्यम आणि त्यांचे प्रतिनिधी हे समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांना न्याय देण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत असतात. जनतेच्या समस्या जगाच्या वेशीवर टांगून लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम पत्रकार करत असतात. मात्र खरं पाहिलं तर पत्रकारांचेही अनंत प्रश्न आहेत. त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी सकाळचे संपादक संदीप काळे यांनी राज्यभरातीलच नव्हे तर देशातील पत्रकारांचे प्रभावी संघटन उभा केले आहे. मीडियाचा आवाज बुलंद करण्यासाठी त्यांनी उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद व प्रशंसनिय आहे.
व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेचे विभागीय अधिवेशन नुकतेच बीड येथे संपन्न झाले . या कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणा म्हणून मला निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी व्हाईस ऑफ मिडीयाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष मंदार फणसे, इलेक्ट्रॉनिक विंगचे राज्याध्यक्ष विलास बडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, पत्रकार बालाजी मारगुडे, संजय मालाणी आदींसह मराठवाड्यातून आलेल्या सातशेवर पत्रकारांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला उपस्थित राहून मला उपस्थित पत्रकारांशी संवादित होता आले याचा मला मनापासून आनंद आहे.
लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी झगडणाऱ्या पत्रकारांच्या स्वतःच्या ही अनेक समस्या आहेत. लोकांसाठी शासन व प्रशासन यांच्याशी दोन हात करून वेळप्रसंगी जीवावर उदार होणाऱ्या पत्रकारांवर जेव्हा वेळ येते तेव्हा त्यांच्या पाठीशी कोणीही उभा राहत नाही हा आजपर्यंतचा अनुभव आहे. म्हणून पत्रकारांनी चरितार्थासाठी व अर्थार्जनासाठी स्वतःचे छोटे-मोठे उद्योग- व्यवसाय केले पाहिजेत या मताचा मी आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख असताना तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मला अनेक पत्रकारांची आरोग्य सेवा करता आली, त्यांच्या दवाखान्याच्या समस्यांमध्ये मला फुल ना फुलाची पाकळी अशी मदत करता आली. खरं तर आरोग्य विषयक मदत करणं हा माझ्या कामाचाच भाग होता, पण मी केलेल्या आरोग्यसेवेला लोकाभिमुख करण्याचे काम पत्रकारांनी केले. मी किती काम केले याचा कधीही हिशोब ठेवला नाही मात्र राज्यभरातील पत्रकारांनी मला देवदूत ही उपाधी देऊन माझ्यासारख्या सामान्य माणसाचा खऱ्या अर्थाने सन्मानच केला आहे.
पत्रकारांकडे समाज कोणत्या नजरेने पाहतो यात मी पडणार नाही. मात्र माझ्याबाबत 100% पत्रकार हे सकारात्मकच राहिले आहेत. त्यामुळे माझी ही त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी तशीच आहे. पत्रकारांच्या घर, आरोग्य, विमाकवच, संरक्षण आदी समस्या सोडविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या व्हाईस ऑफ मीडियाचा आवाज भविष्यात बुलंद व्हावा ही अपेक्षा…
राज्यभरातील सर्वच पत्रकारांना उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा…
डॉ.ओमप्रकाश सदाशिव शेटे