HTML img Tag
लोहारा (प्रतिनिधी):
लोहारा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा व पवनचक्की प्रकल्पांमधून हरित विजेची निर्मिती होत असतानाही स्थानिक नागरिकांना मात्र अघोषित लोडशेडिंगचा जाच सहन करावा लागत आहे. या ‘दिव्याखाली अंधार’ असलेल्या परिस्थितीविरुद्ध महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून, अघोषित लोडशेडिंग तातडीने बंद न झाल्यास येत्या ५ ऑगस्ट रोजी महावितरण कार्यालयावर तीव्र ठिय्या आंदोलन करून टाळे ठोकण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
या संदर्भात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांना एक गंभीर निषेध निवेदन सादर करण्यात आले.
निवाड्यातील प्रमुख मुद्दे आणि समस्या:
‘दिव्याखाली अंधार’ परिस्थिती: तालुक्याच्या जमिनीचा वापर करून दररोज लाखो युनिट विजेची निर्मिती केली जात आहे. परंतु, ही वीज इतरत्र पाठवून स्थानिक नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना मात्र रात्रीच्या वेळी ७ ते ८ तास अंधारात राहावे लागत आहे.
शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान: विहिरी आणि कूपनलिकांना पाणी उपलब्ध असूनही विजेच्या कमी दाबामुळे (Low Voltage) पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे. तसेच, वारंवार वीज गेल्याने विद्युत पंप जळून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
व्यापारी व विद्यार्थ्यांची कोंडी: वीज पुरवठा सतत खंडित होत असल्यामुळे छोटे व्यापारी, वेल्डिंग व्यावसायिक, झेरॉक्स सेंटर चालकांचा व्यवसाय ठप्प झाला असून, विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मोठा व्यत्यय येत आहे.
स्वराज्य पक्षाच्या प्रमुख मागण्या:
१. लोहारा तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील अघोषित लोडशेडिंग तातडीने बंद करण्यात यावे.
२. सौर व पवन ऊर्जा प्रकल्पांची उपलब्धता लक्षात घेता लोहारा तालुक्याला ‘लोडशेडिंगमुक्त तालुका’ घोषित करून २४ तास अखंडित वीज पुरवठा करावा.
३. शेतीपंपांसाठी दिवसा सलग ८ तास पूर्ण दाबाने (थ्री-फेज) वीज देण्यात यावी.
४. जळालेले ट्रान्सफॉर्मर (डीपी) तक्रार प्राप्त झाल्यानंतर २४ तासांच्या आत बदलून मिळावेत.
५ ऑगस्टला महावितरण कार्यालयाला टाळे ठोकणार!
येत्या ४ दिवसांत लोहारा तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास छत्रपती संभाजीराजेंच्या विचारांवर चालणारा महाराष्ट्र स्वराज्य पक्ष रस्त्यावर उतरेल. ५ ऑगस्ट २०२६ रोजी लोहारा येथील महावितरण कार्यालयावर तीव्र ठिय्या आंदोलन करून कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा थेट इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीस महावितरण प्रशासनच पूर्णपणे जबाबदार राहील, असेही पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष महेश गोरे, विजय मुरटे, युवा हिंदू साम्राज्य सेनेचे तुळशीदास पवार , प्रदीप मुगळे , ओमकार चौगुले, गंगाराम भोंडवे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Back to top button
error: Content is protected !!