शारदीय नवरात्र महोत्सवातील घटस्थापना मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते सुरु करावी आ.राणा दादांची मागणी

लोहारा/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील पंढरपूर देवस्थान येथिल श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वारकरी संप्रदायासह अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. संपूर्ण महाराष्ट्रसह भारतातील तसेच परदेशातील लोक हे विठुरायाच्या भेटीच्या ओढीने आषाढी एकादशीला पंढरपूरला येत असतात. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब यांनी पंढरपुरातील आषाढी एकादशीची विठ्ठलाची शासकीय पूजा करण्याची प्रथा सुरू केली. संपूर्ण भारताचे आराध्य दैवत व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिशक्ती आई तुळजाभवानी हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तिपीठ आहे. नवरात्रात नऊ दिवस प्रत्येक दिवशी वाढणाऱ्या माळेने भाविकांच्या श्रद्धेस आराधनेची भरती येत असते. आई तुळजाभवानी देवीजींची शारदीय नवरात्रात घटस्थापना हा भाविकांसाठी एक परमोच्च क्षण असतो. जिल्ह्यातील सर्व भाविकांची अशी इच्छा आहे की, आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाची मुख्यमंत्री यांचे शुभहस्ते शासकीय पूजा होते. त्याप्रमाणे संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असलेली महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिशक्ती आई तुळजाभवानी देवीजींची घटस्थापना देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे शुभहस्ते करण्याची प्रथा आपल्या हिंदुत्ववादी सरकारच्या काळात सुरू करावी. अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे करण्यात आली. तरी महाराष्ट्रातील भाविकांच्या श्रद्धेचा मान ठेवून भारताचे आराध्य दैवत महाराष्ट्राची कुलस्वामीनी आदिशक्ती आई तुळजाभवानी देवीजींची घटस्थापना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे शुभहस्ते करण्याची प्रथा आपल्या लोकप्रिय हिंदुत्ववादी सरकारने सुरू करावी, ही धाराशिव जिल्ह्यातील जनतेच्या मनातील भावना लोकनेते आ.राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाकडे केली.