लोहारा / प्रतिनिधी
लोहारा-उमरगा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. नद्या-नाले धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत, शेतशिवार पाण्याखाली गेले आहेत आणि अनेक कुटुंबांच्या घरांचा पावसामुळे चिखलात पाया डळमळू लागला आहे. या संकटात हिप्परगा रवा (ता. लोहारा) येथील रफिक इमाम मुलाणी यांच्या कुटुंबावर काळाने घाव घातला. काल रात्रीच त्यांचे राहते घर कोसळले आणि कुटुंब अक्षरशः बेघर झाले.
ज्ञानज्योती फाउंडेशनची तत्काळ धावपळ
ही माहिती मिळताच ज्ञानज्योती फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा युवती सेना मराठवाडा निरीक्षक ॲड. आकांक्षा ज्ञानराज चौगुले स्वतः घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी मुलाणी कुटुंबाची भेट घेऊन आधार दिला. फाउंडेशनतर्फे जीवनावश्यक वस्तूंसह प्राथमिक आर्थिक मदत देण्यात आली. “ही मदत नसून आमचे कर्तव्य आहे,” अशा शब्दांत चौगुले यांनी आपत्तीग्रस्त कुटुंबाला धीर दिला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणूरे यांनी जिल्हाधिकारी धाराशिव व लोहारा तहसीलदारांना थेट फोन करून माहिती दिली. आपत्तीग्रस्त कुटुंबाला तातडीने शासकीय मदत मिळावी, अशी आग्रही मागणी केली.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख मोहन पणूरे, तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, उपतालुकाप्रमुख परवेज तांबोळी,माजी पं.स. सदस्य इंद्रजीत लोमटे, उमरगा विद्यार्थी सेनेचे संदीप चौगुले, विनोद मोरे, सारंग घाटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.