शासन आपल्या दारी उपक्रम राबविणार – आ. अभिमन्यू पवार

औसा / रमेश शिंदे – शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांसह सामान्य माणसाच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करीत असताना औसा विधानसभा मतदारसंघात चांगले अधिकारी आणायचा प्रयत्न करून नागरिकांचे मूलभूत सुविधासह शेतकऱ्यांच्या दुष्टीने महत्त्वाच्या संकल्पना राबवित असताना सकारात्मकपणे काम करीत असलेल्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने लोकांनी आपली कामे करून घ्यावीत असे आवाहन आमदार अभिमन्यू पवार यांनी केले आहे.
औसा पंचायत समितीच्या वतीने आयोजित (दि.२५) रोजी औसा येथील वार्षिक आमसभेत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार भरत सूर्यवंशी, गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे, पोलीस निरीक्षक अविनाश पटवारी, महावितरण चे कार्यकारी अभियंता जाधव, भाजपचे जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, कृषी अधिकारी संजय ढाकणे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ निंबाळकर, प्रा. सुधीर पोतदार, संजय कुलकर्णी, सरपंच संघटनेचे अध्यक्ष विष्णू कोळी, आदीसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते विक्रमी कर वसुली करण्यात आलेल्या किल्लारी, उजनी व लामजना ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसेवक तसेच सुंदर गाव अंतर्गत उटी (बु) येथील सरपंच व ग्रामसेवकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याचबरोबर औसा तालुक्यातील शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ४६ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना आमदार अभिमन्यू पवार म्हणाले की शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी मतदारसंघात शेत तिथे रस्ता, मनरेगातून फळबाग लागवड, शेततळे, सिंचन विहीरी, जनावरांचे गोटे आदी योजना प्रभावीपणे राबविल्या जात असून त्या माध्यमातून मतदारसंघाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात जनावरांचे गोटे हे आपले मिशन आहे. सर्व सामान्य नागरिकांना पाण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतंत्र रोहित्री, गाव तिथे स्मशानभूमी उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य असून त्या अनुषंगाने कामे केली जात आहेत.महिला बचत गट सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने बाजारपेठ उपलब्ध करून देणे महत्त्वाचे असल्याचे सांगून वृक्षलागवड क्षेत्र वाढले पाहिजे यासाठी औसा येथे १५ कोटींची हायटेक नर्सरी उभारली जात असून त्याव्दारे विविध फळांचे रोप उपलब्ध करून दिले जातील. तसेच झाडे युक्त बंधारे हि संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.भूकंपग्रस्त पुनर्वसित जुन्या गावातील जागेवर वृक्ष लागवड करण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाने काम करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
या आमसभेत लोकांनी मांडलेल्या बहुतांश समस्यांचे निराकरण जागेवर करण्यात आले.तर काही प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संबंधित विभागाला आ. अभिमन्यू पवार यांनी संबंधित विषयांचा निपटारा करण्याच्या सूचना दिल्या.घरकुल योजना, सिंचन विहीरी व जनावरांचे गोटे योजना बाबत दिरंगाई होता कामा नये. कुठेही शेतकऱ्यांची पिळवणूक होईल असे कृत्य होता कामा नये असे सांगून चांगले काम करीत असलेल्या सरपंच च्या कामाचा आदर्श घेऊन इतर सरपंचाने काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.