लोहारा शहरात कुस्त्यांचा थरार…! खवसपूरच्या विक्रमसिंह भोसलेने एक लाखाचे बक्षीस पटकाविले

लोहारा : लोहारा शहरात आयोजित खुल्या कुस्ती स्पर्धेस मोठा प्रतिसाद मिळाला. अंतिम लढत खवसूपर येथील महाराष्ट्र केसरी विजेता विक्रमसिंह भोसले, कोल्हापूर येथील शाहू केसरी विजेता संग्राम पाटील या दोन पैलवानात लढत झाली. तुल्यबळ व चित्तथरारक झालेल्या लढतीत संग्राम पाटील याला आसमान दाखवत विक्रमसिंह भोसले विजेता ठरला. आमदार कैलास घाडगे-पाटील, उस्मानाबदचे माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अशोकराव जवळगे यांच्या हस्ते विजेता पैलवान भोसले याला चांदीचा गदा व रोख एक लाख रूपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. उपविजेता पैलवान पाटील याचाही रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अॅड. दीपक जवळगे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील हायस्कूल लोहारा मैदानावर खुल्या कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन तहसीलदार संतोष रूईकर, साहयक पोलिस निरीक्षक सुरेश नरवडे, पोलिस उपनिरीक्षक गुलजारखान पठाण, बसवराज वरनाळे, अॅड. दीपक जवळगे, यांच्या हस्ते झाले. यावेळी नायब तहसीलदार माधव जाधव, अमोल बिराजदार, सलीम शेख, महेबूब गवंडी, राजकुमार काकडे, पंडित ढोणे, पंडित पाटील यांची उपस्थिती होती. स्पर्धेत राज्यासह परराज्यातील नामवंत मल्लांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. त्यामुळे कुस्त्यांची दंगल पाहाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पाच हजारांपासून ते ३१ हजार रुपयांपर्यंतच्या कुस्त्या झाल्या. अंतिम कुस्तीसाठी चांदीचा गदा व रोख एक लाख रूपयांचे पारितोषक ठेवण्यात आले होते. ३१ हजार रूपयांसाठी हरियाणा राज्यातील मल्ल सोमेंदरसिंग, उस्मानाबाद येथील हणुमंत पुरी यांच्यात लढत झाली. यात सोमेंदरसिंग याला धूळ चारत पुरी वेजेता ठरला.
लातूर येथील प्रदीप काळे, सोलापूर येथील रामा शेळके यांच्यात झालेल्या लढतीत शेळके यांनी बाजी मारली. या दोन्ही कुस्तीमधील विजेते पुरी व शेळके यांना प्रत्येकी ३१ हजारांचे रोख पारितोषक देण्यात आले.
चांदीची गदा व एक लाख रूपयांच्या पारितोषिकासाठी शाहू केसरी विजेता संग्राम पाटील, महाराष्ट्र केसरी विजेता विक्रमसिंह भोसले यांच्यात अंतिम कुस्तीचा सामना झाला. दोन्ही मल्ल तुल्यबळ असल्याने रंगत वाढली. दोघांकडून शक्तीचा आणि युक्तीचा पुरेपुर वापर केला जात होता. सुमारे अर्धातास सामना रंगला. अखेर या चित्तथरारक लढतीत भोसले याने आपल्या ठेवणीतला डाव मारत पाटील याला चारीमुड्या चित करून चांदीचा गदा व एक लाख रूपयांचे पारितोषक पटकाविले. आमदार कैलास घाडगे-पाटील, मकरंद राजेनिंबाळकर, अशोकराव जवळगे यांच्या हस्ते पारितोषक देऊन गौरविण्यात आले. पैलवान रामेश्वर कार्ले, पैलवान धनराज भुजबळ, माधव जाधव यांनी पंच म्हणून काम पाहिले.