रस्त्यावरील खड्डा चुकविताना मोटारसायकल बाजूच्या पुलाला धडक दिल्याने मोटारसायकल चालक जागीच ठार

जेवळी, ता.५ ( ता.लोहारा ) : भोसगा तांडा (ता.लोहारा) येथील रोहित टोपाजी राठोड (वय.२१) हा युवक शुक्रवारी (ता.५) सकाळी दहाच्या सुमारास जेवळी येथील आपल्या नातेवाईकांना भेटून स्वताच्या नव्या कोऱ्या मोटारसायकल (यामाहा आर-१५) वरुन परत गावी (भोसगा तांडा) जात होता. लोहारा- आष्टामोड या राज्य मार्गावरील दक्षिण जेवळी येथील वीज वितरण कंपनीच्या तेत्तीस केव्ह केंद्राकडे जाणाऱ्या वळणावरील पुलाला जोरदार धडक दिल्याने हा युवक जागीच ठार झाला आहे. रोहित राठोड हा जेवळी पश्चिम तांड्यातील ऊस वाहतूक ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करीत होता. आठ दिवसापूर्वीच यामाही या कंपनीचे नव्या तंत्रज्ञानाची मोटरसायकल त्यांनी घेतली होती. या मोटरसायकला अद्याप परमनंट नंबरही मिळालेला नाही. या मोटरसायकचा पिकप व वेग अधिक असून अशी मोटर सायकल चालविण्याची फारसी सवय नसल्यामुळे भरदार वेगात रस्त्यावरील खड्डा चुकवित असताना मोटार सायकलचा ताबा सुटून पुलावर जाऊन आदळला. या नंतर रोहित व मोटारसायकल पुलाच्या खड्या जाऊन पडले. यात मोटर सायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी मोटार सायकल स्वाराच्या डोक्याला जबर मार लागल्याने हा युवक जागीच ठार झाला आहे. या युवकाच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.