शहरात लवकरच उभारणार मराठवाडा भवन

पिंपरी ( प्रतिनिधी ) :
पिंपरी चिंचवड शहर परिसरात मराठवाडावासीयांचे मोठ्या संख्येने वास्तव्य आहे. मराठवाडावासियांना हक्काचे व्यासपीठ असावे, या उद्देशाने पिंपरी चिंचवडमध्ये येत्या काही दिवसात सर्व सोयी सुविधायुक्त मराठवाडा भवन उभारणीला सुरुवात करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष व उद्योजक अरुण पवार यांनी केले.
मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड परिसरातील मराठवाडावासियांच्या दसरा स्नेह मेळाव्याचे शाहुनगर येथे आयोजन करण्यात आले होते. स्त्री शक्तीचा गौरव म्हणून स्त्रियांच्या हस्ते उद्घाटन करून अमर जवान स्मारक प्रतिकृतीला मानवंदना देण्यात आली.
मराठवाडा जनविकास संघ व मराठवाडा भूमिपुत्र पिंपरी चिंचवड शहर संस्थेच्या वतीने या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिरॅमिड हॉलमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या माहितीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे आयोजन नितीन चिलवंत व जीवन बोराडे
यांनी केले होते.
या स्नेहमेळाव्याला माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष व उद्योजक अरुण पवार, व्यंकटराव शिंदे, गोरख भोरे, बाळासाहेब काकडे, सुर्यकांत कुरुलकर, मालोजी भालके, आण्णा मोरे, नरेंद्र माने, गोपाळ माळेकर, सत्यजित चवधरी,प्रशांत जाधव, डी. एस. राठोड, अभिमन्यु पवार, प्रल्हाद लिपने, तुकाराम गोंगाने, सुनील भोसले, जीवन बोराडे, सतीश काळे, रामहारी केदार, मुंजाजी भोजने, मारुती बानेवार, शिवकुमार बायस, गणेश खरात, विजय घोडके, राजेंद्र गाडेकर, मनोज मोरे, प्रियंका बोराडे आदी उपस्थित होते.
🔴 तीन ठराव संमत
■ शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या बलिदान दिनी नवी दिल्ली येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव आयोजन करणे.
■अमृतमहोत्सवी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी बालेवाडी स्टेडियम येथे ७५ हजार नागरिकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून देशभक्तीपर कार्यक्रमांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम साजरा करणे.
■ पिंपरी चिंचवड महानगरात सर्व सोयी सुविधांयुक्त मराठवाडा भवन उभा करणे.