जेवळी येथे कार चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने कार नाल्यात पाच जण जखमी

जेवळी ( ता.लोहारा ) : भरधाव वेगाने जाणाऱ्या कार चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने गाडी रोडच्या बाजूला नाल्यात गेल्याने गाडीतील पाच जखमी झाले आहेत. त्यापैकी दोन गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूरला पाठवण्यात आले. ही घटना दक्षिण जेवळी गावाजवळ मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वरून लोहारा या तालुक्याच्या ठिकाणी जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक211 वरील आष्टामोड ते जेवळी या रस्त्यावरील रस्ता दुरुस्ती आणि डागडुजीचे काम गेल्या पंधरा दिवसापासून सुरू आहे. या डागडुजीच्या कामामुळे काही ठिकाणी अजून रस्त्यावर खडी आहे. खसगी ता उमरगा येथील पाच जण या वाहनातून खाजगी कामासाठी लोहारा येथे एम एच 25 आर 3905 या वाहनातून जात होते. वेगाने जाणाऱ्या वाहनावरील चालकांचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात जावून पडली त्यात वाहनातील चालक मल्लिकार्जुन कलशेट्टी वय 26, प्रमोद सोनकांबळे वय 27, राजेंद्र सोनकांबळे वय 26, महेश धोंडूमने वय 32, सुदीप गायकवाड वय 31
सर्व रा खसगी हे पाचही जण जखमी झाले. ही घटना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दक्षिण जेवळी गावापासून एक किमी अंतरावर व्हनाळी नाल्याजवळ घडली.
अपघात झाल्याची माहिती मिळताच जवळपासच्या शेतात काम करणारे शेतकरी आणि शिव बसव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव कारभारी यांनी सर्वच जखमींना जेवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्षा मध्ये घालून उपचारासाठी दाखल केले. मात्र प्रमोद सोनकांबळे आणि महेश धोंडमने या दोघांची प्रकृती गंभीर असल्याने डाँक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूल येथे पाठवले आहे. गंभीर दोन्ही जखमींवर खाजगी रूग्णालयात सुरू असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते महादेव कारभारी यांनी दिली.