जिल्हाधिकारी यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा ऊसतोड कामगारांना फायदा

लोहारा ( उस्मानाबाद) : लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथील लोकमंगल माउली कारखाना येथे परजिल्हा, परराज्यातील ऊसतोड कामगारांना तहसिलदार संतोष रुईकर यांच्या हस्ते रेशन धान्याचे वितरण शनिवारी करण्यात आले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात सर्व साखर कारखान्यात कामाला आलेल्या उसतोड मजूरांना कारखान्याचे ठिकाणी रेशन धान्य वितरीत करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला. त्यानुसार लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथील लोकमंगल माऊली साखर कारखान्याच्या ठिकाणी विविध जिल्ह्यातून, परराज्यातून आलेल्या ऊसतोड मजुरांना स्वस्त धान्य वितरणाची सुरुवात करण्यात आली.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पोर्टबिलिटीद्वारे धान्य वाटप केले जात आहे. सदर वाटप कारखान्याच्या ठिकाणी हंगाम संपेपर्यंत सुरु राहणार आहे. यामुळे परजिल्हयातील, परराज्यातील उसतोड मजुरांची कामासाठी स्थलांतरामुळे रेशन अभावी होणारी अडचण दूर होणार आहे. कारखाना स्थळी शासकीय स्वस्त धान्य दुकानामध्ये धान्य उपलब्ध होत असल्याने उसतोड मजुरामध्ये समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी तहसिलदार संतोष रुईकर, लोकमंगल माउली साखर कारखान्याचे कार्यकारी अधिकारी वाघोलीकर, प्रशांत पाटील, कृषी अधिकारी कुलकर्णी, नायब तहसीलदार महादेव जाधव, शासकीय स्वस्त धान्य दुकानदार दिलीप जाधव, इन्नुस पटेल, गुरुनाथ पाटील यांच्यासह उसतोड कामगार उपस्थित होते.
उस्मानाबाद जिल्ह्यात सर्व साखर कारखान्यात कामाला आलेल्या उसतोड मजूरांना कारखान्याचे ठिकाणी रेशन धान्य वितरीत करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला. यांचा शुभारंभ लोकमंगल कारखाण्यावर करण्यात आला असून यांचा फायदा ऊसतोड कामगारांना होणार आहे.
संतोष रुईकर,तहसिलदार,लोहारा