धाराशिव

दुष्काळ निवारणासाठी महिलांचा पुढाकार; ४७ गावांतील १३५ महिलांचा सहभाग

स्वयम शिक्षण प्रयोगच्या वतीने लोहारा पंचायत समितीत तालुकास्तरीय संवाद कार्यशाळा; विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन

लोहारा ( जि. धाराशिव ) : तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई, जनावरांसाठी चारा-पाण्याचे नियोजन, शेतीच्या समस्या आणि ग्रामीण रोजगाराच्या प्रश्नांवर उपाययोजना शोधण्यासाठी स्वयम शिक्षण प्रयोगच्या वतीने सोमवारी (ता. २३) पंचायत समिती, लोहारा येथे तालुकास्तरीय दुष्काळ निवारण संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत तालुक्यातील ४७ गावांमधील १३५ महिला सहभागी झाल्या होत्या.

 

HTML img Tag Simply Easy Learning

पंचायत समितीच्या विविध विभागांतील अधिकाऱ्यांनी महिलांना शासकीय योजनांची माहिती देत त्यांच्या प्रश्नांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. यावेळी उपस्थित अधिकारी व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. उमा शितोळे यांनी प्रास्ताविकातून अनियमित पाऊस, शेतीचा वाढता खर्च, पिकांना मिळणारा कमी भाव, पिण्याच्या पाण्याची समस्या, जनावरांसाठी चारा-पाणी तसेच ग्रामीण भागातील रोजगार व स्थलांतराच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले.

पशुसंवर्धन विभागाचे डॉ. आकाश गुजेवाड यांनी दुष्काळी परिस्थितीत जनावरांची काळजी, चारा व पाण्याचे नियोजन, लसीकरण आणि पशुवैद्यकीय तपासणी याबाबत मार्गदर्शन केले. चारा साठवणूक, मुरघास निर्मिती, हायड्रोपोनिक चारा आणि अझोला यांसारख्या पर्यायांची माहिती देत कमी पाण्यात जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध करण्याच्या पद्धती समजावून सांगितल्या.

एस. आर. शामराज यांनी VB-G RAM G योजनेअंतर्गत ग्रामीण कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या तरतुदी, जॉब कार्ड, कामाची मागणी, मजुरी आणि गावपातळीवर घेता येणाऱ्या विकासकामांची माहिती दिली. जलसंधारण, शेततळे, नाला व ओढ्यांची कामे, मृद व जलसंधारण आणि ग्रामीण रस्त्यांसारखी कामे ग्रामसभेत मांडून मंजूर करून घेण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी नागनाथ कुंभार यांनी पंचायत समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, पिण्याच्या पाण्याचे नियोजन आणि दुष्काळी परिस्थितीतील प्रशासकीय उपाययोजनांची माहिती दिली. महिलांनी आपल्या गावातील समस्या ग्रामपंचायत व ग्रामसभेत मांडून योजनांचा लाभ मिळविण्यासाठी नियमित पाठपुरावा करावा, असे त्यांनी सांगितले.

विस्तार कृषी अधिकारी राजपूत यांनी जलतारा, विहीर पुनर्भरण, चारा लागवड आणि फळबाग लागवड यांसारख्या योजनांची माहिती दिली. एक एकर क्षेत्रावर चारा लागवड केल्यास सुमारे १७ हजार रुपये अनुदान मिळण्याची तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पाच एकरपेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची, तर पाच एकरच्या आतील क्षेत्रासाठी एमआरएसअंतर्गत उपलब्ध तरतुदींची माहिती दिली. अल्पभूधारक शेतकरी जॉब कार्डच्या माध्यमातून जलतारासारखी कामे करू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

स्वयम शिक्षण प्रयोगच्या गावपातळीवरील कार्यकर्त्या संगीता कांबळे आणि आशा पवार यांनी महिला कृती गटाच्या माध्यमातून गावविकासासाठी सुरू असलेल्या कामांचे अनुभव मांडले. पाणी, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, रोजगार, शेती आणि महिलांच्या प्रश्नांवर महिलांनी एकत्र येऊन चर्चा करणे, समस्या ग्रामपंचायत व ग्रामसभेत मांडणे आणि विकास आराखड्यात महिलांच्या गरजांचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करणे, याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले.

 

कार्यशाळेदरम्यान महिलांनी गावातील पाणीटंचाई, जनावरांसाठी चारा-पाणी, शेतीतील अडचणी, रोजगाराची समस्या आणि शासकीय योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी मांडल्या. अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत संबंधित विभागांच्या योजनांची माहिती दिली. महिलांचा गावविकासातील सक्रिय सहभाग आणि प्रशासनाशी समन्वयातून दुष्काळी समस्यांवर उपाय शोधण्याची गरज या संवादातून अधोरेखित झाली.

कार्यक्रमास स्वयम शिक्षण प्रयोगच्या लीडर आशा पवार, अनिता बाबळे, लक्ष्मी सुरवसे, जोशना तोडकरी, बालिका मोरे, निकिता कदेरे, संगीता कांबळे, प्रियंका बिराजदार, मंजुळा औरादे तसेच तालुका समन्वयक उमा शितोळे उपस्थित होत्या. निकिता कदेरे यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!