

लोहारा (प्रतिनिधी) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सार्वत्रिक निवडणुका भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचे सूचक वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार बसवराज पाटील यांनी केले. रविवार, २५ ऑक्टोबर रोजी त्यांनी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष तथा जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी यांच्या लोहारा येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी निवडणुकांच्या तयारीचे संकेत दिल्याने तालुक्यातील राजकीय चर्चांना वेग आला आहे. आमदार बसवराज पाटील यांच्या आगमनानिमित्त संगशेट्टी परिवार आणि भाजपच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. शांत, संयमी आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या आमदार पाटील यांच्या या भेटीमुळे स्थानिक भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
दुष्काळ, नापिकी आणि पीक कर्जाच्या प्रश्नांवर चर्चा
या स्नेहभेटीदरम्यान आमदार पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला. लोहारा शहरासह तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न, तीव्र दुष्काळी परिस्थिती, नापिकी आणि शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवताना येणाऱ्या प्रशासकीय अडचणी यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या अडचणी आणि स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कार्यकर्त्यांनी जनतेच्या संपर्कात राहून काम करण्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार पाटील म्हणाले, “तुम्ही जनतेच्या दरबारात प्रामाणिकपणे काम करत राहा. तुमच्या पाठीशी मी स्वतः आणि संपूर्ण भाजप पक्ष खंबीरपणे उभा आहे.” त्यांच्या या आश्वासनामुळे उपस्थित कार्यकर्त्यांना बळ मिळाले.
निवडणुकांच्या तयारीचे संकेत
आगामी राजकीय वाटचालीबाबत भाष्य करताना आमदार बसवराज पाटील यांनी येणाऱ्या सर्व स्थानिक व सार्वत्रिक निवडणुका पूर्ण ताकदीने लढविण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपने आगामी निवडणुकांच्या दृष्टीने संघटनात्मक तयारीवर भर देण्याचे संकेत मिळाले आहेत. या भेटीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, तालुक्यातील आगामी राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी दिलीप भालेराव, संग्राम पाटील, माजी सरपंच शंकर जट्टे, विक्रांत संगशेट्टी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत काळे, दीपक मुळे, जिल्हा चिटणीस प्रमोद पोतदार, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रशांत लांडगे, पत्रकार नीलकंठ कांबळे, हरी लोखंडे, दगडू तिगाडे, संतोष फावडे, तानाजी माटे, अशोक दुबे, समीर शेख, विकी मोरे, मल्लिनाथ फावडे, सुयश दंडगुले, बाबा सुबेकर, मुरलीधर होनाळकर यांच्यासह भाजप पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



