जेवळी, ता. लोहारा (प्रतिनिधी): लोहारा तालुक्यातील जेवळी येथे सद्गुरू संत श्री बाळूमामा पालखी सोहळा यंदाही अत्यंत भक्तीमय, उत्साहपूर्ण आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देणाऱ्या वातावरणात पार पडला. बुधवार (दि. १५) ते रविवार (दि. १९) या पाच दिवसांच्या धार्मिक सोहळ्यात हजारो भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. कीर्तन, भजन, महाआरती, महाप्रसाद, पालखी मिरवणूक अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
सद्गुरू संत श्री बाळूमामांनी आयुष्यभर गोरगरीब, वंचित आणि तळागाळातील समाजघटकांच्या सेवेसाठी कार्य करत मानवतेचा संदेश दिला. त्यांची शिकवण, सेवाभाव आणि सर्वसमावेशक विचार आजही समाजाला प्रेरणा देत असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.
कीर्तन, भजन आणि महाप्रसादाने भरला भक्तीचा रंग पाच दिवसांच्या सोहळ्यात दररोज सायंकाळी ह.भ.प. अनुष्का दुधभाते महाराज, ह.भ.प. विश्वनाथ गर्जे महाराज आणि ह.भ.प. गोविंद तुगावकर महाराज यांच्या कीर्तन सेवेमुळे भाविक मंत्रमुग्ध झाले. जेवळीसह परिसरातील विविध भजनी मंडळांनी दररोज भजनाची सेवा अर्पण केली. सकाळ-सायंकाळ महाआरती झाली, तर हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

मुस्लिम समाजाच्या सहभागातून जपला सर्वधर्मसमभाव
यंदाच्या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे मुस्लिम समाजाचा उत्स्फूर्त सहभाग. मुस्लिम समाजातील महिलांनी पालखी तळावर पाण्याचा सडा टाकून बाळूमामांची पूजा केली.
गावातील सर्व समाजबांधवांनी महाप्रसादासाठी अन्नधान्य दान करून धार्मिक कार्यात सहभाग नोंदविला. या उपक्रमातून जेवळी गावातील सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि जातीय सलोखा अधोरेखित झाला.
आमदारांसह मान्यवरांची उपस्थिती
या धार्मिक सोहळ्यादरम्यान आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पालखी तळावर भेट देऊन बाळूमामांचे दर्शन घेतले व आयोजकांचे कौतुक केले.
टाळ-मृदंगाच्या गजरात निघाली भव्य पालखी मिरवणूक
रविवारी (दि. १९) गावातील मुख्य रस्त्यावरून सद्गुरू संत श्री बाळूमामांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. टाळ-मृदंग, धनगरी ढोल, ढोल-ताशांच्या गजरात आणि “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” या अखंड जयघोषाने संपूर्ण गाव दुमदुमून गेले.

मिरवणुकीत बाळूमामांचे मेंढरू, अश्व, आकर्षक रथ आणि फुलांनी सजविलेली पालखी हे भाविकांचे विशेष आकर्षण ठरले. डोक्यावर कलश घेऊन महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. गावातील महिलांनी मिरवणूक मार्गावर विविध ठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत केले. गावातील सर्व मंदिरांना भेट देत पालखी पुढील मुक्कामाकडे मार्गस्थ झाली.
ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे सोहळ्याला यश
सोहळा यशस्वी करण्यासाठी गणेश मंडळ, नवरात्रोत्सव मंडळ, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा कार्यकर्त्या, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस प्रशासन, विविध देवस्थानचे पदाधिकारी, व्यापारी संघटना, ग्रामस्थ आणि सद्भक्त यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन दत्तात्रय गाडेकर, अशोक शिंगाडे गुरुजी, गोविंद जेवळीकर, बब्रुवान ढोबळे आदी ग्रामस्थांनी केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे पाच दिवसांचा हा धार्मिक सोहळा शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.
सद्गुरू संत श्री बाळूमामा पालखी सोहळ्याच्या माध्यमातून भक्ती, सेवा, सामाजिक ऐक्य आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश पुन्हा एकदा समाजापर्यंत पोहोचला. त्यामुळे हा सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक एकात्मतेचा प्रेरणादायी उत्सव ठरला.
Back to top button
error: Content is protected !!