
लोहारा,( धाराशिव) प्रतिनिधी : पीक विमा नुकसानभरपाईतून वगळण्यात आलेल्या १४ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा मिळावा, तसेच कमी नुकसानभरपाई मिळालेल्या महसूल मंडळांनाही न्याय मिळावा, या मागण्यांसाठी ३० जुलै रोजी लोहारा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
पीक विमा अभ्यासक अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून, सकाळी ११ वाजल्यापासून लोहारा तहसील कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात होणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात जिल्ह्यातील उर्वरित महसूल मंडळांचा डेटा विमा कंपनीमार्फत पोर्टलवर अपलोड करण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून, लवकरच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम जमा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
मात्र, अद्याप वगळलेल्या १४ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नसल्याने हा लढा सुरूच राहणार असल्याचे अनिल जगताप यांनी स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हे आंदोलन निर्णायक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Back to top button
error: Content is protected !!