धाराशिवमहाराष्ट्रराजकीय

उमरग्यात शिवसेनेचा ‘चक्काजाम’; महावितरण, पीक विमा, स्मार्ट मीटरसह चार मुद्द्यांवर सरकारला इशारा

आ. प्रवीण स्वामी यांची सरकारवर टीका; "शेतकरी, विद्यार्थी आणि जनतेच्या प्रश्नांवर शिवसेना रस्त्यावरच राहणार"

लोहारा/उमरगा : शेतकऱ्यांना दिवसा अखंडित व योग्य दाबाने वीजपुरवठा, लोहारा तालुक्यातील वंचित तीन महसूल मंडळांचा पीक विम्यात समावेश, NEET-TET पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई, तसेच पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांना न्याय मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सोमवारी उमरगा येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौकात रास्ता रोको व चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.

आंदोलनात आमदार प्रवीण स्वामी यांनी राज्य सरकार आणि महावितरणच्या कारभारावर जोरदार टीका केली. धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होत असतानाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा नियमित वीज मिळत नसल्याने शेतीचे मोठे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले. कमी दाबामुळे विद्युत मोटारी जळत असून ट्रान्सफॉर्मर वारंवार निकामी होत आहेत. ग्रामीण भागात सुरू असलेल्या इमर्जन्सी लोडशेडिंगमुळे विद्यार्थी, माता-भगिनी आणि व्यापाऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचा आरोप त्यांनी केला.


स्मार्ट मीटरबाबतही त्यांनी सरकारवर निशाणा साधत, ग्राहकांच्या संमतीशिवाय जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम तातडीने थांबवावी आणि इच्छुक ग्राहकांना जुने मीटर पुन्हा बसवून द्यावेत, अशी मागणी केली.

लोहारा तालुक्यातील तीन महसूल मंडळांना अद्याप पीक विम्याचा लाभ मिळालेला नसल्याचा मुद्दा उपस्थित करत, या मंडळांचा तातडीने विमा योजनेत समावेश करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा शिवसेना आंदोलन अधिक तीव्र करेल, असा इशारा देण्यात आला.

देशभर गाजलेल्या NEET व TET पेपरफुटी प्रकरणाचा निषेध करत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या दोषींवर जलदगतीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच लडाखमधील पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारने सकारात्मक दृष्टीने पाहून त्यांना न्याय द्यावा, अशीही भूमिका आंदोलकांनी मांडली.
यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी, “शेतकरी, सामान्य जनता आणि विद्यार्थ्यांचा संयम आता संपत चालला आहे. वीज हा आमचा घटनात्मक व मूलभूत हक्क आहे, कोणाची मेहरबानी नाही. सरकारने तात्काळ परिस्थिती सुधारली नाही तर जनतेच्या हक्कांसाठी शिवसेना स्टाईलने अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा दिला.

प्रमुख मागण्या शेतकऱ्यांना दिवसा किमान आठ तास अखंडित व योग्य दाबाने वीजपुरवठा करावा.
लोहारा तालुक्यातील वंचित तीन महसूल मंडळांचा तातडीने पीक विम्यात समावेश करावा. NEET-TET पेपरफुटीतील दोषींवर कठोर कारवाई करावी. पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय द्यावा.

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम थांबवून जुने मीटर पुन्हा बसवावेत.

आंदोलनात ज्येष्ठ शिवसैनिक अशोक आप्पा सांगवे, डॉ. अजिंक्य पाटील, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख विजयकुमार नागणे, तालुकाप्रमुख सुधाकर पाटील, युवासेना तालुकाप्रमुख अजित चौधरी, माजी सभापती रणधीर पवार, उपतालुकाप्रमुख संतोष कलशेट्टी, विजय तळभोगे, सिद्धाराम हत्तरगे, किरण कुकुर्डे, धीरज बेळंबकर, मारुती थोरे, अण्णाराव माने, नितीन बिराजदार, महेबुब लंगडे, वहाब आत्तार, जनार्दन बिराजदार, तानाजी जाधव, माधव जाधव यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक, विद्यार्थी व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!