लोहारा तालुका क्रीडा संकुलासाठी ५ कोटी रुपये निधी मंजुर – आमदार ज्ञानराज चौगुले

लोहारा (जि.धाराशिव ) : लोहारा तालुक्यातील जेवळी येथील लोहारा तालुका क्रीडा संकुलासाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करून येथील विविध क्रीडा विषयक सोयीसुविधांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजुर करून घेतला आहे. लोहारा तालुक्यासाठी क्रीडा संकुल नसल्यामुळे या भागातील खेळाडूंना कोणत्याही सोयी-सुविधा उपलब्ध नव्हत्या. या क्रीडा संकुलामुळे तालुक्यात्तील क्रीडाविषयक उपक्रम वाढण्यास मदत होणार आहे.
मंजुर निधीतून जेवळी येथील तालुका क्रीडा संकुलात इनडोअर गेम हॉल, क्रीडा संकुलासाठी संरक्षक भिंत, क्रीडा संकुलातील विद्युतीकरण, क्रीडा संकुलातील पाणीपुरवठा व्यवस्था व ड्रेनेज व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या इनडोअर गेम हॉलमुळे कुस्ती, बॅडमिंटन, तायक्वांदो, जुदो, कराटे, तलवारबाजी, कबड्डी, टेबल टेनिस, आदी खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची सोय होणार आहे. लोहारा तालुका क्रीडा संकुलासाठी लोहारा शहराच्या जवळ जागा उपलब्ध नसल्यामुळे अनेक दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. जेवळी ग्रामपंचायतीने जेवळी येथील सुमारे ८ एकर जागा उपलब्ध करून दिल्यामुळे तालुका क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा झाला आहे.
सदर कामासाठी मंजुरी दिल्याबद्दल आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे आभार मानले आहेत.