सामाजिक

“एच.आय.व्ही. संसर्गितांच्या जीवनाचा, मार्ग हक्काचा सन्मानाचा” भेदभाव टाळून एकसंघ राहण्याचा – आर.बी.जोशी

लोहारा ( जि.धाराशिव ) :  संपूर्ण जगभरात १ डिसेंबर हा दिवस ‘जागतिक एड्स दिन’ म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण मानव समाजाने एच.आय.व्ही. सह जगणाऱ्या व्यक्तीबरोबर भेदभाव टाळून एकसंघ राहण्यासाठी सहकार्य करावे. या वर्षीच्या जागतिक एड्स दिनाचे हे घोष वाक्य आहे. असे प्रतिपादन श्री. रमाकांत जोशी प्रकल्प अधिकारी स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर यांनी केले. ०१ डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित स्पर्श च्या सभागृहात महाविद्यालयीन विध्यार्थी तसेच शान्तेश्वर विद्यालयातील स्काऊट गाईड, एन.सी.सी. विद्यार्थी, शाळेतील विद्यार्थी व आरोग्य कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी, आशा सेविका, सास्तूर गावातील युवक युवती यांना मार्गदर्शन करताना केले. ते पुढे म्हणाले कि, ‘मार्ग हक्काचा सन्मानाचा, एच.आय.व्ही.सह जगणाऱ्या व्यक्ती बरोबर भेदभाव टाळून एकसंघ राहू या’ हे या वर्षीचे घोषवाक्य असून यामध्ये समुदायाने हिरीरीने भाग घेणे आवश्यक आहे.
सध्या एच.आय.व्ही./एड्सचे प्रमाण सगळीकडे कमी झालेले आहे. आता सगळीकडे एच.आय.व्ही. /एड्सविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. विविध माध्यमाद्वारे जसे आय.ई.सी. साहित्य, एच.आय.व्ही. विषयी लघुफिल्म, विविध प्रकारच्या चित्रफिती, मेळावे, आरोग्य शिबीर, पटकथा, कलापथक, समुपदेशन व चाचणी केंद्र इत्यादी च्या मार्फत जाणीवजागृती केली जाते. तसेच ग्रामसभा महिला मेळावा इत्यादी मधून पण समाजामध्ये जागृती केली जाते. जेणे करून एच.आय.व्ही./एड्सचा विळखा समाजातून नष्ट होण्यास मदत होईल.
जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून आज दि.२ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग दापकु जिल्हा रुग्णालय धाराशिव व स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने सास्तूर गावात जनजागरण रँली काढण्यात आली. या रँलीचे उदघाटक स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी श्री जोशी आर.बी., स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे वैदकीय अधिकारी डॉ भक्तराज ठोंबरे, डॉ. भाग्यश्री येवते श्री. अच्युत आदटराव यांनी हिरवी झेंडी दाखवून रँलीला सुरुवात झाली.
एच.आय.व्ही.चा संसर्ग धोका कमी करण्यासाठी “एच.आय.व्ही.बद्दल योग्य माहिती मिळवा आणि निरोगी राहा”, “कंडोमचा योग्य व नियमित वापर करा” रक्त चाचणी करा आणि एच.आय.व्ही.ची स्थिती जाणून घ्या. याबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी १०९७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा असे श्री रमाकांत जोशी यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणात सांगितले.
“टाळा टाळा, एड्स टाळा”, “निरोध वापरा, एड्स टाळा”,“आधी तपासणी रक्ताची, मग सुपारी लग्नाची”, “एड्सची मैना, करी जीवाची दैना”, “नारी शक्ती करे पुकार, एच.आय.व्ही. एड्स हद्दपार”
अशा विविध घोषवाक्यांनी संपूर्ण सास्तूर गाव दुमदुमून गेले. एच.आय.व्ही. एड्स विषयी लोकांमध्ये असलेली भीती, शंका, गैरसमजुती, अज्ञान यावर विजया मिळवून निरोगी समाज पर्यायाने निरोगी महाराष्ट्र निर्माण करण्याचे ध्येय सर्वांनी आत्मसात करून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच लग्नाअगोदर प्रत्येक युवक –युवतीची एच.आय.व्ही.तपासणी करणे हे फार महत्त्वाचे आहे. जन्म पत्रिका न बघता एच.आय.व्ही.ची स्थिती काय आहे हे पहिले पाहिजे असे स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक श्रीम दीपा पवार यांनी उपस्थिताना आवाहन केले. तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या लोकांनी मनात असलीही भीती न बाळगता स्वताची एच.आय.व्ही. चाचणी करून घ्यावी. शासनामार्फत प्रत्येक सरकारी दवाखान्यात एच.आय.व्ही विषयी मोफत सल्ला व चाचणी केली जाते. याचा पुरेपूर उपयोग ग्रामस्थांनी करावा असेहि आवाहन त्यांनी केले.
रँलीमध्ये स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे श्री. अच्युत आदटराव, स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे सर्व कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्पर्श ग्रामीण रुग्णालय आय.सी.टी.सी.विभागाचे प्रयोगशाळा तंत्रज्ञा श्री.आझम शेख, समुपदेशक श्रीमती. दीपा पवार, औषध निर्माण अधिकारी श्री. विक्रम कुंभार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री.विशाल वेदपाठक, समुपदेशक श्री. सुधीर रोडगे व श्री. युवराज मोरे तसेच शान्तेश्वर विद्यालयाचे सह शिक्षक श्री. शेषेराव पवार व श्री. जाधव सर, या सर्व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!