आपत्ती निवारणासाठीचे दीपस्तंभ; मा.सुरेशदाजी बिराजदार – माधवराव पाटील

संकटांना सामोरे जाऊन त्याच्या यशस्वितेतुन मिळवलेली दृढनिश्चयता, राजकीय जीवनात वावरत असताना अपवादानेच आढळणारा प्रामाणिकपणा, शेतकऱ्यांची लेकरं शिकावीत यासाठी तळमळ व्यक्त करणारे संस्थाचालक, शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवून ,त्यांच्या समृद्धीचा मार्ग कारखान्याच्या उत्कर्षात शोधणारे कारखान्याचे चेअरमन, शेतकऱ्याच्या जीवनातला अर्थ शोधून तोच अर्थ त्याच्या खिशात कसा जाईल यासाठी भाऊसाहेब बिराजदार बॅऺकेची स्थापना करणारे बॅऺकेचे यशस्वी चेअरमन, राजकीय महत्त्वाकांक्षा नाकारून हृदयात स्थान असणाऱ्या नेत्यांसाठी जिवाचं रान करणारे आदरणीय दाजी, राजकारणाच्या दीर्घकालीन प्रवासात कसलाही भ्रष्टाचाराचा डाग नसलेलं एक प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणजे दाजी. अशी कितीतरी दाजिचे गुणवैशिष्ट्ये सांगता येतील, परंतु त्यांच्या कार्याची खरी ओळख होते ती आपत्ती निवारणासाठीच्या कामाने होते.
भुकंपग्रस्ताच्या अनेक समस्या दाजींनी सोडवल्या, त्या काळात सुरवातीच्या काळात पत्र्याचे शेड उभारणी असो, वा मोडकळीस पडलेला विद्युत पुरवठा असो या प्रत्येक बाबतीत दाजींनी जे काम केलं ते निश्चितच त्यांच्या अलौकिक कार्याची पावती देऊन जाते. कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी लागणार होत्या त्यासाठीचे दाजींचे प्रयत्न अत्यंत तळमळीचे होते . शेतकऱ्यांचे नुकसान न होऊ देता वाटल्यास त्यांच्या पिकांची नुकसान भरपाई सहित त्यांना मदत कशी देता येईल याची शासन दरबारी केलेली पायपीट आम्ही बघितले आहे. एवढेच नव्हे तर शेतकरी आणि शासन यांच्यातील एक संवादाचे माध्यम म्हणून दाजींनी जे काम केले त्याचाच परिणाम नवीन गावच्या पुनर्वसनासाठीच्या जमिनी मिळण्यात झाला हे मी माझ्या अनुभवाने सांगतो आहे. आणि येथूनच येणाऱ्या आपत्तीचे निवारण कसे करावयाचे त्याचे बाळकडू आदरणीय पवार साहेब व डॉक्टर पद्मसिंह पाटलाकडून दाजींना मिळाले .व यानंतर कुठलीही आपत्ती असो ती मानवनिर्मित किंवा निसर्गनिर्मित असले तरी सुद्धा आपण न डगमगता न गोंधळता काम केले पाहिजे हा विश्वास उराशी बाळगून दाजिंची निश्चयी अशी राजकीय कारकीर्दिची सुरुवात झाली.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे उसाचे क्षेत्र पावसाचे प्रमाण अधिक झाले की वाढते आणि त्या काळातला ऊस शेतकऱ्याचा जात नाही किंवा कारखान्याकडून अनेकदा कोंडी झालेली दाजींनी बघितले परंतु दाजी काही करू शकत नव्हते कारण हक्काचा कारखाना नव्हता अगदी त्याचप्रमाणे मराठवाड्यातील ऊसाला भाव देताना पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादकतेपेक्षा तीनशे रुपये कमीने देऊन साखर उताराच्या नावाखाली शेतकऱ्याच्या मेहनतीचं मुल्य काढून टाकले जात होते. आणि ही समस्या आपल्याला काही करून सोडवावी लागेल त्यासाठी एक अत्यंत धाडसाने पाऊल उचलून आर्थिक सुबत्ता नसताना सुद्धा कारखाना उभा करावा लागेल याची खूणगाठ दाजींनी मनाशी बांधली
दाजी आणि आपत्ती हे समीकरणच जणू दाजीच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालले होते .2018 ला बलसुर व परिसरात असेच एक चक्रीवादळ आले आणि पुन्हा एकदा 1993 च्या भूकंपाची आठवण झाली. घरे पडली, झाडे पडले ,लाईटचे पोल उध्वस्त झाले .पंधरा दिवस विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद पडला. पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या या वीस गावात जाणवू लागली एवढी भीषण समस्येच्या विवंचनेत लोक असतानाच पुन्हा एकदा मदतीला आले ते दाजीच .आता मात्र आपत्तीला सामोरे जायला दाजी काय नवखे नव्हते. त्यांनी प्रशासनाच्या मदतीने पूर्ण चक्र हलवली विद्युत चे काम करून घेतले पाणीपुरवठा सुरळीत केला व आपत्ती व्यवस्थापन कसे करायचे त्याचे उत्तम उदाहरण घालून दिले.
सर्व सुरळीत चालले आहे असे वाटतानाच 2020 -21 ची अतिवृष्टी झाली व हा परिसर पूर्ण जलमय झाला, पिके उध्वस्त झाली, नद्यांना पूर आले .राजेगाव सारख्या तेरणेच्या काठावर वसलेल्या गावात पुराने वेढा टाकला आणि तेथील काही नागरिक झाडावर चढून जीव वाचवण्याच्या प्रयत्न करत होते हे जेव्हा दाजीला समजले लागलीच दाजींने अजित दादाच्या संपर्कातून बचाव व मदत कार्य करणाऱ्या तुकडीच्या साह्याने नागरिकांची सुटका करून दिली .आपत्ती व्यवस्थापनाचा हा दांडगा अनुभव कळंब मधील पूरग्रस्तांसाठीही उपयोगी ठरला.
आपली मुले समाजाची किंवा राष्ट्राची बहुमोल संपत्ती आहे. परिवाराचे भावी सुख तथा समाजाचे उत्थान अथवा पतन येणाऱ्या पिढीच्या वर्तनावर अवलंबून असते यात शंकाच नाही म्हणून विद्यार्थी तसेच मुलावर उत्तम संस्कार सहज शक्य असतात. आणि या विचारशीलतेतूनच ,शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या माध्यमातून सचिव म्हणून काम करत असताना अनेकांना बळ देण्याचे काम दाजी ने केलेले आहे .सर्वांगीण विकास घडवत असताना चारित्र्यसंपन्न ,कार्य कुशल ,आत्मनिर्भर युवक तयार झाला पाहिजे या दाजीच्या संकल्पनेला पुन्हा एकदा मानवनिर्मित आपत्तीने गालबोट लागले. एका मुलाच्या आक्षेपहार्य लिखाणाने दाजी कमालीचे अस्वस्थ झाले व पुन्हा एकदा आपत्ती निवारण्यासाठीचे आपले सारे कौशल्य पणाला लावले व आठ दिवस कमालीचा ताण सोसून दाजीने सर्व धर्मीय सद्भावना रॅली काढली व या मानवनिर्मित आपत्तीवर मात केली.
आपत्तीची ही मालिका जणू दाजीच्या जीवनाशी सतत पाठलाग करताना आजही दिसते आहे. आत्तापर्यंत आलेल्या प्रत्येक आपत्तीवर खंबीरपणे मात करणारे दाजी, काल-परवाच अजित दादाच्या रूपाने पक्षात जेंव्हा आव्हान निर्माण झाले त्यावेळेस मात्र पूर्ण हतबल झालेले दाजी आम्ही पाहिले. विचाराचा वारसा साहेबांकडून मिळवला होता व कार्याची गती यासाठी मात्र दादांचा आदर्श समोर होता. कोणाला निवडायचं हा खूप मोठा प्रश्न दाजी पुढे होता. आणि याही वेळेस दाजींनी एका वैचारिक परिपक्वतेचे दर्शन घडवले. घाई गडबडीत कुठलाही निर्णय न घेता प्रत्येक दिवशी आपल्या कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करूनच निर्णय घेतला . साहेबांचा पुरोगामी विचारांचा वारसा न सोडता दादांच्या कर्तव्य तत्परतेला स्वतःला जोडून घेतले. व पुन्हा एकदा इथल्या शेतकर्याला कारखान्याच्या माध्यमातून वैभवाच्या शिखरावर जाण्यासाठी संधी दिली. बुद्धीचा भावनिक उद्रेक न होऊ देता अत्यंत शांतपणे चर्चेद्वारे साहेब ,की दादा यांच्यातला मार्ग शोधून काढला.
राजकीय जीवनात वावरत असताना अनेक अनुभव आपल्याला पाहायला मिळतात अनेकांना आपत्ती, ही ईष्टाप्पत्तीच वाटत असते. मात्र दाजी याला अपवाद आहेत .समुद्रातील जहाजांना बंदरापर्यंत रस्ता दाखवण्यासाठीच्या कामासाठी दीपस्तंभ आवश्यकच असतो त्याशिवाय ते जहाज सुखरूपपणे किनाऱ्याला लागत नसते. अगदी त्याचप्रमाणे आपत्ती निवारणाचे दाजी चे काम आहे .शक्तीच्या व कायद्याच्या आधारे भीती न दाखवता सुद्धा राजकीय कारकीर्द मानवतेच्या शिखरावर नेऊन पोहोचवता येते हे दाजींनी आपल्या कर्तव्यातून आम्हा सर्वांना दाखवून दिले आहे.
यापुढेही अनेक असे प्रसंग येणार आहेत की जे मानवी जीवन विचलित करू शकतात त्यासाठी आवश्यक असतो तो संयम, कमालीची कार्यमग्नता .आणि होय, या सर्वांसाठी दाजी तत्पर राहणारच यात तिळ मात्र शंका असण्याचे कारण नाही. त्यासाठी आम्ही उदतपूरवाशीय परमेश्वरापुढे मनोमन प्रार्थना करत आहोत की, यापुढील दाजीची राजकीय वाटचाल अत्यंत यशस्वी होवो. त्यासाठीचे त्यांना सुदृढ आरोग्य लाभो, व दाजी राजकीय वैभवाच्या शिखरावर विराजमान होवो .हीच एक प्रार्थना विधात्याच्या चरणी.३५वर्षाच्या राजकीय जीवनात कोणतेही मोठे राजकीय पद नसताना सुद्धा जर दाजीची कारकीर्द एवढी दैदिप्यमान होत असेल तर निश्चितच दाजी आमदार, खासदार झाल्यावर हा भाग अत्यंत विकसित होईल,आणि हे सांगायला कोणत्याही भविष्यवेत्याची गरज पडेल असे मला तरी वाटत नाही.
दाजी, जन्मदिनाच्या लाख,लाख शुभेच्छा.

माधवराव दादासाहेब पाटील,(मा.सरपंच) उदतपूर,ता.लोहारा.
मो.९१५८५७८३६५

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!