HTML img Tag
लोहारा : ईश्वराची जगातील सर्वात सुंदर निर्मिती आणि सहनशक्तीचा स्त्रोत म्हणजे स्त्री होय… असे मत प्राचार्य श्री. शहाजी जाधव यांनी व्यक्त केले. न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल, लोहारा येथे जागतिक महिला दिनानिमित्त भव्य महिला सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री. शहाजी जाधव होते, तर प्रमुख अतिथी म्हणून संचालिका सौ. सविता जाधव, प्रा. यशवंत चंदनशिवे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर शाळेतील सर्व महिला शिक्षिका व महिला कर्मचाऱ्यांचा लेखणी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी मीरा माने यांनी जागतिक महिला दिन साजरा करण्यामागील इतिहास व त्याचे महत्त्व स्पष्ट केले. सौ. सविता जाधव यांनी आपल्या कवितेतून “कधीही न सुटणारे कोडे म्हणजे स्त्री” असे म्हणत महिलांचे सामाजिक योगदान, आरोग्य, कार्यक्षमता आणि संघर्ष यावर मार्मिक प्रकाश टाकला.
प्रा. यशवंत चंदनशिवे यांनी “चूल व मूल” ते प्रत्येक क्षेत्रामध्ये आजची नारी जगात भारी कशी आहे याची विविध उदाहरणे देऊन स्त्रीच्या कर्तृत्वाचा गौरव केला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य श्री. शहाजी जाधव यांनी “नारी तूच शक्ती आहेस, तूच सन्मान आहेस” असे सांगत महिलांच्या योगदानाला सलाम केला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. जागतिक महिला दिनानिमित्त पार पडलेल्या या सोहळ्याने उपस्थितांना प्रेरणा व ऊर्जा मिळाली.
Back to top button
error: Content is protected !!