शेतकरी मित्रानो “ गोगलगायीपासून सावधान ”

जुलै महिन्याचा दुसरा पंधरवाडा गोगलगायीद्वारे अंडी टाकण्याचा राहणार असल्यामुळे जुलै महिन्याचा पहिला पंधरवाडा गोगलगायीच्या प्रभावी नियंत्रणासाठी निर्णायक राहणार आहे. त्यामुळे पहिल्या पंधरवाडयातच सर्व शेतकऱ्यांनी मोहीम स्वरूपात गोगलगायीचे एकात्मिक व्यवस्थापन करावे असे आवाहन कृषि विभाग व कृषि विद्यापीठाने केले आहे.
सर्वसाधारण गोगलगायी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवडयात जमिनीखाली सुप्तावस्थेत जातात आणि जून महिन्यात चांगला पाऊस होताच त्या सुप्तावस्थेतून बाहेर येऊन जमिनीच्यावर येतात.
मागीलवर्षी सुप्तावस्थेत गेलेल्या गोगलगायी चालू वर्षातील जून ंमहिन्याच्या शेवटच्या आठवडयात झालेल्या पावसानंतर सुप्तावस्था संपवून जमिनीच्या वर आलेल्या आहेत.
सध्या मागीलवर्षी गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे दुबार पेरणी कराव्या लागलेल्या क्षेत्रामध्ये गोगलगायीचा प्रादुर्भाव जास्त आढळून येत आहे.
सुप्तावस्था संपवून जमिनीवर आलेल्या गोगलगायी पहिल्या पंधरा दिवसात समान आकाराच्या गोगलगायीशी संग करून पंधरा दिवसानंतर जमिनीच्याखाली प्रत्येक गोगलगाय 100 ते 150 अंडी टाकणार आहे.
या अंडयाद्वारे गोगलगायीची पुढील वर्षाची पिढी तयार होणार आहे.
त्यामुळे अंडी टाकण्याच्या अगोदर जर आपण गोगलगायीचे नियंत्रण केले तर चालू हंगामातील सोयाबीन पिकाबरोबरच पुढील वर्षातील सोयाबीन पिकाचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे.
गोगलगायीचे एकात्मिक व्यवस्थापन
गोगलगायी सोयाबीन पिकाचे रोपावस्थेत मोठया प्रमाणात नुकसान करत असल्यामुळे रोपावस्थापूर्वीच गोगलगायीचे नियंत्रण करणे आवशयक आहे.
सध्या सुप्तावस्थेतून बाहेर आलेल्या गोगलगायी दररोज सकाळी 6 ते 8 च्या दरम्यान बांधाच्या बाजूने आढळून येत आहेत.
त्यामुळे गोगलगायीच्या प्रभावी नियंत्रणासाठी गावातील सर्व शेतकऱ्यांनी मोहीम स्वरुपात सकाळी 6 ते 8 च्या दरम्यान शेतात जाऊन जमिनीच्या वर आलेल्या गोगलगायी गोळा कराव्यात.
गोळा केलेल्या गोगलगायी कुठेही न टाकून देता साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात किंवा गोळा केलेल्या गोगलगायीवर मिठ किंवा चुन्याची भुकटी टाकावी.
त्यासोबतच सुतळीचे बारदाने गुळाच्या पाण्यात भिजवून आदल्या दिवशी बांधाच्या बाजूने रॅन्डम पद्धतीने टाकावेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बारदान्याखाली जमा झालेल्या गोगलगायी गोळा करून मिठाच्या अथवा साबणाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात.
याशिवाय स्नेलकिलच्या छोटया छोटया गोळया बांधाच्या बाजूने 5 ते 7 फुट अंतरावर टाकून द्याव्यात किंवा गोगलगायीचा प्रादुर्भाव जास्त क्षेत्रावर झाला असल्यास स्नेलकिल गोळ्याचे पावडर तयार करून पाण्याच्या मदतीने पेस्ट तयार करावी आणि अशी पेस्ट मूरमुऱ्याला लावावी व असे मुरमुरे गोगलगाय प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रावर टाकावेत.
स्नेलकिल हे औषध गोगलगायीना आकर्षून घेते आणि या स्नेलकिल गोळीला किंवा स्नेलकिलयुक्त मूरमुऱ्याला खाल्यानंतर 4 ते 5 तासात गोगलगायीच्या शरीरातील स्त्राव बाहेर पडून गोगलगायी नष्ट होतात.
गोगलगायी गोळा करताना हातात हातमोजे घालणे आवश्यक आहे.
प्रा.अरुण गुट्टे
विस्तार कृषि विद्यावेत्ता
विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र, लातूर