धाराशिवकृषी

प्रगती घोटाळे यांच्या पाठपुराव्याला यश लोकमंगलच्या थकीत उस बिलांसाठी साखर आयुक्तांचे कारखान्यास आदेश

लोहारा : प्रतिनिधी
लोकमंगल साखर कारखान्यास ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांची थकीत उस बिले तात्काळ अदा करावीत, या मागणीसाठी लोहारा पंचायत समिती सदस्या प्रगती घोटाळे यांनी पुणे येथे साखर आयुक्त संजय कोलते यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी झालेल्या चर्चेनंतर आयुक्तांनी संबंधित कारखान्यास पुढील आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांची उर्वरित बिले अदा करण्याचे आदेश दिल्याची माहिती प्रगती घोटाळे यांनी दिली.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, १५ डिसेंबर २०२५ पासून सहा लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची अनेक उस बिले अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाहीत. तसेच १५ जानेवारी २०२६ नंतर ऊस पुरवठा करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनाही त्यांच्या उसाची देयके मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत साखर आयुक्तांसोबत चर्चा करताना प्रगती घोटाळे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या.

उसाचे बिल वेळेवर न मिळाल्याने शेतकऱ्यांना शेतीची मशागत, पेरणीसाठी लागणारे साहित्य खरेदी, कुटुंबातील विवाह सोहळे, शैक्षणिक खर्च तसेच इतर दैनंदिन गरजा भागविताना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे अनेक शेतकरी मानसिक तणावाखाली असल्याची बाबही त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नाची गंभीर दखल घेत साखर आयुक्त संजय कोलते यांनी संबंधित कारखान्यास पुढील आठवड्यापर्यंत सर्व प्रलंबित उस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश दिले. आयुक्तांच्या सकारात्मक भूमिकेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तत्परतेने दखल घेतल्याबद्दल प्रगती घोटाळे यांनी साखर आयुक्त संजय कोलते यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!