राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाविद्यालयांनी तयारी करावी – सिनेट सदस्य देविदास पाठक यांचे प्रतिपादन

इक्बाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील महाविद्यालयांनी तयारी करावी आणि या प्रक्रियेत विद्यार्थी पालक यांच्यासह सर्व शैक्षणिक घटकांना सामावून घेऊन या धोरणाचे स्वरूप समजावून सांगून याचा लाभ सर्वसामान्य विद्यार्थ्यांना ग्रामीण भागापर्यंत पोहोचवावा नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत येणारे शैक्षणिक प्रवाह तसेच इतर शिक्षणाच्या संधी याची माहिती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य देविदास पाठक यांनी केले.
ते दि.11 जुलै रोजी लोहारा आणि उमरगा तालुक्यातील महाविद्यालयाना सदिच्छा भेटी प्रसंगी बोलत होते. यावेळी लोहारा शहरातील शंकरराव पाटील वरिष्ठ महाविद्यालय,
श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळ उमरगा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य देविदास पाठक यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील वरिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य तथा सचिव डॉ.शेषेराव जावळे पाटील यांनीही सिनेट सदस्य देविदास पाठक यांचा सन्मान केला. उमरगा येथे श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मल्लिनाथ दंडगे, प्राचार्य दिलीप गरुड यांनी शाल श्रीफळ देऊन श्री पाठक यांचा सत्कार केला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजाराम मस्के, पत्रकार इक्बाल मुल्ला, पत्रकार आकाश पोतदार, प्रा.डॉ.एस. एस.कदम, प्रा.डॉ. आर.एम. सुर्यवंशी, प्रा.बी. बी. मोटे, प्रा.डॉ.आर.एस. धप्पाधुळे, प्रा.डॉ. पी. के. गायकवाड, प्रा.डॉ.व्हि.डी. आचार्य, प्रा.डॉ.सी.जी.कडेकर, प्रा.डॉ. एम.एल. सोमवंशी, प्रा. डी.एन.कोटरगे, प्रा.डॉ. बी. एस. राजोळे, प्रा.डॉ.एस.एल. कोरेकर यांच्यासह आदी उपस्थित होते.