उर्वरीत थकीत ऊसाचे ५०० रुपये द्यावा या मागणीसाठी शेतकऱ्यांचे शोले स्टाईल आंदोलन

लोहारा : थकीत ऊस बिल देण्याची वेळोवेळी मागणी करूनही लोकमंगल कारखाना प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने लोहारा तालुक्यातील होळी येथील संतप्त शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहन करण्याच्या उद्देशाने हातात पेट्रोल बाटल्या घेऊन सुमारे सहा तास आंदोलन केले. दरम्यान, कारखाना प्रशासनाने बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
लोहारा तालुक्यातील होळी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गतवर्षी लोकमंगल कारखान्यास ऊस दिला आहे. लोकमंगल कारखान्याने ऊस दर दोन हजार प्रमाणे दिला होता. त्यामुळे उर्वरीत थकीत ५०० रुपये दराचा हप्ता द्यावा, या मागणीसाठी होळी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अनेकवेळा कारखाना प्रशासनास निवेदन देऊन थकीत बिलाची मागणी केली. तसेच यापूर्वी कारखाना स्थळी आंदोलन केले होते. दरम्यान, पाच जानेवारीपर्यंत थकीत बिल देण्यात यावे, अन्यथा मंगळवारी १० जानेवारीला सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सर्व शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन होळी येथील सार्वजनिक पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू करून निर्णय लवकर घ्या, अन्यथा सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला. कारखाना प्रशासनाचे अधिकारी उशिरा आले. त्यामुळे तब्बल सहा तास आंदोलन करण्यात आले. यावेळी कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी उद्या बुधवारी (ता.११) पोलिस ठाण्यात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले.
त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनतात केशव सरवदे, व्यंकट माळी, पांडुरंग जाधव, दत्तू भोसले, अमोल गायकवाड, प्रवीण मोरे, संजय जाधव, प्रियेश जाधव, भुजंग मोरे, शिवाजी पवार, अनिल गायकवाड, माधव पाटील, मारुती जाधव, किसन पाटील, अमोल शिंदे, ज्ञानेश्वर गवळी, दत्तू गिरी, मधुकर बिराजदार, व्यंकट जाधव सहभागी झाले.