सोलापूर : सोलापुर शहरातील प्रभाग क्र. ०८ मधील नागरी समस्यांचे दैनंदिन निराकरण करण्याच्या उद्देशाने प्रभाग फेरीदरम्यान आज सकाळी विणकर उद्यानातील विविध असुविधांची नगरसेवक गौरीशंकर ऊर्फ प्रविण दर्गोपाटील यांनी वॉकिंग ग्रुप व स्थानिक नागरिकांसह प्रत्यक्ष पाहणी केली.
या पाहणीदरम्यान उद्यानातील पाणीपुरवठा व्यवस्था, स्वच्छतेच्या समस्या, विद्युत विषयक अडचणी, पडून असलेले बाद व अनावश्यक स्क्रॅप साहित्य, तसेच काही ठिकाणी वॉकिंग ट्रॅकवरील असमतोल भाग आदी त्रुटी निदर्शनास आणल्या. उद्यानातील माळी व बाग रक्षकांच्या उपस्थितीत या सर्व बाबींची सखोल पाहणी करण्यात आली.
नगरसेवक दर्गोपाटील यांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांशी तात्काळ दूरध्वनीवर संपर्क साधून समस्या त्वरीत दूर करण्याबाबत सूचना दिल्या. उद्यान विभाग, विद्युत विभाग, सहाय्यक अभियंता व अवेक्षक आदी अधिकाऱ्यांशी समन्वय साधत त्वरित कार्यवाहीसाठी पाठपुरावा करण्यात आला.
नगरसेवकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे वॉकिंग ग्रुपचे सदस्य व स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, प्रभागातील नागरी समस्यांचे दैनंदिन निराकरण करण्यासाठी सुरू असलेल्या या कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे.